गावगाथा

ठळक बातम्या

बोरगाव (दे.) येथे श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा

 बोरगाव (दे.) येथे श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव उत्साहात साजरा

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

तालुक्यातील बोरगाव (दे.) येथील श्री खंडोबा मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला. “येळकोट येळकोट जय मल्हार..! सदानंदाचा येळकोट..!” या जयघोषाने आणि भंडाऱ्याच्या उधळणीने संपूर्ण बोरगाव ग्राम दुमदुमून गेले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

चंपाषष्ठी हा मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला साजरा केला जाणारा पौराणिक उत्सव आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान शंकराचा अवतार खंडोबाने मणी-मल्ल या राक्षसांचा वध करून लोकांना त्यांच्या अत्याचारांतून मुक्त केले. त्या विजयाच्या स्मरणार्थ हा सण मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी खंडोबाच्या नवरात्रीची सांगता होते व ‘तळी भरणे’ हा मुख्य धार्मिक विधी पार पडतो.

उत्सवानिमित्त चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी जागरण गोंधळ, पहाटे लंगर तोडण्याचा विधी, महापूजा, आरती तसेच संपूर्ण गावातून श्री खंडोबा देवाची पालखी व नंदीध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. महानैवद्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री खंडोबा देवाची पूजा मंदिराचे पुजारी शशिकांत फुलारी यांच्या हस्ते संपन्न झाली. उत्सव यशस्वी करण्यासाठी हंसराज कामशेट्टी, भीमशंकर जिरगे, लिंबण्णा जिरगे, आनंदराव भोसले, शरणप्पा जिरगे, खंडाप्पा जिरगे, महादेव माने, अर्जुन धरगुंडे, खुशाबा बंदिछोडे, राम कामशेट्टी, चंद्राम जिरगे, राजेंद्र जुबरे, ज्ञानेश्वर माने, नितीन जिरगे, शरद भोसले, सचिन जिरगे, पिराप्पा कामशेट्टी, महादेव जिरगे, खंडाप्पा कामशेट्टी, योगेश फुलारी, राजू माने, तानाजी निंबाळकर, दयानंद पाटील, बाबाराव जिरगे, परमेश्वर देडे तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.


चौकट

श्री क्षेत्र अक्कलकोट येथेही चंपाषष्ठी उत्सव उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसरातील श्री स्वामी समर्थ महाराज आलेले प्रथम स्थळ असलेल्या श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मंदिराचे मुख्य पुरोहित गुरव बंधू यांच्या हस्ते श्री खंडोबा देवाची पूजा, महाआरती, महानैवद्य व महाप्रसादाचे धार्मिक कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता.


जय मल्हार..!