गुलाबी थंडीसोबतच हुरड्याचा हंगामही जोरात; कृषी पर्यटन केंद्रांकडे पर्यटकांचा ओघ
हुरडा महोत्सव

- हुरडा महोत्सव
गुलाबी थंडीसोबतच हुरड्याचा हंगामही जोरात; कृषी पर्यटन केंद्रांकडे पर्यटकांचा ओघ

एक दिवसांच्या सहलीसाठी हा प्रकार सोयीस्कर असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप, कौटुंबिक सहली, स्नेहमेळाव्यांसाठी हुरडा पार्टीला पसंती मिळते, असे कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सांगितले.
गुलाबी थंडीत शेकोटीची ऊब घेत जोडीला चटकमटक चवीचा हुरडा, दुपारच्या जेवणाला चुलीवरचे गरमागरम जेवण आणि ऊन मावळतीला शेतात फेरफटका…पुण्याच्या सीमेवरील कृषीपर्यटन केंद्रातील ‘हुरडा पार्ट्या’ सध्या रंगायला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर अखेरीस थंडीने जोर धरल्यामुळे कृषी पर्यटन केंद्रांनी हुरड्याचा हंगाम सुरू झाल्याचे जाहीर केले असून, छोट्या सुट्ट्यांसाठी पर्यटकांनी हुरडा पार्टीचा पर्याय निवडला आहे.
हटके पर्यटनाच्या शोधात असलेल्या पर्यटकांसाठी हुरडा पार्टी हे गेल्या काही वर्षात नवीन आकर्षण ठरले आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत हा हुरड्याचा सीझन पर्यटन केंद्रांकडूनही दर वर्षी नवनवीन आकर्षणे घेऊन वीकेंड पार्ट्या आयोजित केल्या जातात. पुणे जिल्ह्यात ज्वारीचे पीक घेतले जात नाही; पण जवळपासच्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांबरोबर करार करून केंद्र चालक हुरडा उपलब्ध करतात. एक दिवसांच्या सहलीसाठी हा प्रकार सोयीस्कर असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप, कौटुंबिक सहली, स्नेहमेळाव्यांसाठी हुरडा पार्टीला पसंती मिळते, असे कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सांगितले.

दोन वर्षे करोनामुळे अनेक बंधने होती. या वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच पर्यटकांचे केंद्रचालकांकडे फोन सुरू झाले. एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फार्म हाउस, रिसॉर्टमधील बुकिंग सुरू झाली असताना एक दिवसाच्या सहलींसाठी हुरडा पार्ट्यांची गर्दीही वाढायला लागली आहे. दोन वर्षांच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या जास्त असेल, अशी अपेक्षा केंद्रचालकांनी व्यक्त केली. हुरडा उत्पादकांनी गेल्या काही वर्षांपासून घरपोच हुरडा पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन खाद्य पदार्थ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी हुरड्याच्या पाकिटांची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. मंडईबरोबरच छोट्या भाजी विक्रेत्यांनी सोलापूरमधील शेतकऱ्यांकडून हुरडा विक्रीसाठी आणला आहे.
पुणे परिसरात चाळीसहून अधिक कृषी पर्यटन केंद्र
केंद्रांमध्ये एक आणि दोन दिवसांची पॅकेज
हुरड्याला, ग्रामीण ढंगाच्या जेवणाची जोड
शिवारफेरी, तलावात नावेतून फेरफटका
पुण्यामध्ये ज्वारीचे पीक हुरड्यासाठी फारसे घेतले जात नाही. पुण्यात प्रामुख्याने औरंगाबाद आणि नगरमधील शेतकऱ्यांकडून हुरडा येतो. या वर्षी पाऊस चांगला झाला आहे, थंडीही समाधानकारक असल्याने हुरड्याचा पुरवठा समाधानकारक आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हुरडा पार्ट्या सुरू झाल्या असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हुरड्यासाठी ग्रुप करून येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. नाताळच्या सुट्ट्यांपासून हुरड्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत जाते.

– कैलास वाडकर, वाडकर फार्म्स्

हुरडा पार्ट्या सुरू झाल्या आहेत. पर्यटकांकडे उपलब्ध असलेल्या वेळेनुसार एक-दिवस दोन दिवसांचे पॅकेज आम्ही उपलब्ध करीत आहोत. पर्यटकांना नैसर्गिक शेती, भाजीपाला प्रक्रियेची माहिती मिळावी यासाठी आम्ही त्यांना शेतात घेऊ जातो. शिवारफेरीबरोबरच जवळच्या देवराईत नेऊन निसर्गाचे महत्त्व समजावून सांगतो. थंडी वाढत जाते तसा हुरड्याचा हंगाम उत्तरोत्तर रंगत जातो.
