गावगाथा

ठळक बातम्या

हजारो नयनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्यांच्यारेशीमगाठी स्व.विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

हजारो नयनांच्या साक्षीने बांधल्या नवदांपत्यांच्यारेशीमगाठी स्व.विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती

 

 

सोलापूर : गोरज मुहूर्तावरची लगबग….मंगलवाद्यांचे सूर…आणि अनुपम्य असा सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी जमलेले हजारो वऱ्हाडी अशा वातावरणात बुधवारी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे २६ जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात झाला. लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,संयोजक आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष होते. प्रारंभी २६ जोडप्यांना सजवलेल्या बग्गीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली. स्व. लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगणापासून सुरुवात झालेली ही वरात सत्यम चौक- साईबाबा चौक – ७० फूट रस्ता – संत तुकाराम चौक – अशोक चौक – वालचंद महाविद्यालय – कर्णिक नगरमार्गे पुन्हा स्व. लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर आली. या ठिकाणी नव वधू-वरांचे हजारो वऱ्हाडींनी मोठ्या आनंदात स्वागत केले. सायंकाळी ५.४२ वाजताच्या गोरज मुहूर्तावर २६ नव्या वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा झाला.

पद्मशाली पुरोहित संघम वेदपाठशाळेच्या श्रीनिवास म्याडम पंतलु आणि आत्माराम चिप्पा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाह विधी करवून घेतले. अक्षता पडताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणी मंगळसूत्र, जोडवे, हार, बाशिंग, शालू, गजरे, गुच्छ, चप्पल तर वरांसाठी जोधपुरी कपडे, फेटा, हार, बाशिंग, गुच्छ, बूट देण्यात आले. तसेच वधूवरांसाठी बाळकृष्ण, कपाट, स्टीलची पाण्याची टाकी, कळशी, ५ ताट, वाट्या, पेले, प्लेट, बादली, परात, तांब्या तसेच अन्य संसार उपयोगी साहित्यही देण्यात आले.

विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्र परिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्व. विष्णूपंत कोठे, पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्ष वेधून घेत होत्या.

विवाहस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वऱ्हाडीनी यावेळी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलन केले.

स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू, पालकमंत्री जयकुमार गोरे, संयोजक आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, शहाजी पवार, अविनाश महागावकर,भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते, देवेंद्र भंडारे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, श्रीनिवास करली, गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, राजकुमार हंचाटे, उमेश गायकवाड, मेघनाथ येमुल, श्रीनिवास पुरुड, राधिका पोसा, सुनिता कामाठी प्रतिमा मुदगल, श्रीकांत डांगे, केदार उंबरजे, दशरथ गोप, सत्यनारायण बोल्ली, ब्रिजमोहन फोफलिया, पेंटप्पा गड्डम, बाळासाहेब वाघमारे, मोनिका कोठे, धनश्री कोंड्याल, राधिका चिलका, कुमुद अंकारम, भाजपाचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे, श्रीनिवास दायमा, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, त्याचबरोबर भाजपाचे माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी राजकीय, प्रशासकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शिक्षण, वैद्यकीय, पत्रकारिता, विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्व. विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधू-वरांना श्री अयोध्येप्रमाणे भगवा ध्वज भेट

मंदिर पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून तीर्थक्षेत्र शी अयोध्येमध्ये मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सत्संग चालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते स्वस्तीच्या जयघोषात भगवा ध्वज फडकविण्यात आला.

श्री राम मंदिराच्या संकल्पाच्या पूर्णहुतीचा आनंद म्हणून स्व विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान तर्फे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नव विवाहित जोडप्यांना तीर्थक्षेत्र श्री अयोध्येतील श्री राम मंदिरावरील भगव्या ध्वजाप्रमाणेच कोविदार वृक्ष ओम ची प्रतिमा असलेला भगवा ध्वज घरावर लावण्याकरिता भेट देण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी हा ध्वज भेट स्वरूपात दिला. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या उपक्रमाचे सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वराडी मंडळींनी कौतुक केले.

————

वऱ्हाडी मंडळींनी घेतला सुग्रास भोजनाचा आस्वाद

स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींकरिता संयोजकांकडून मधुरमिलन लाडू, खारी बुंदी, आलू मटरची भाजी, पुरी, मसाला भात, आमटी असा बेत ठेवण्यात आला होता. या सुग्रास भोजनाचा वऱ्हाडींनी आस्वाद घेतला. संयोजकांकडून विशेषतः आमदार देवेंद्र कोठे यांनी स्वतः जातीने वधू-वरांची आणि सोबत आलेल्या वऱ्हाडींची आस्थेने चौकशी करत त्यांचे आदरातिथ्य केले.
————–

नेटक्या नियोजनाचे झाले तोंड भरून कौतुक

सामुदायिक विवाह सोहळ्याचे संयोजक आमदार देवेंद्र कोठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचे हजारो सोलापूरकरांनी तोंड भरून कौतुक केले. वाहन तळापासून व्यासपीठापर्यंत आणि स्वागत कक्षापासून भोजन कक्षापर्यंत प्रत्येक काम बारकाईने नियोजन करून करण्यात येत होते. याकरिता शेकडो स्वयंसेवक गेल्या १५ दिवसांपासून अखंडपणे परिश्रम घेत होते.
——–

व्यक्तीचित्र रांगोळीचे झाले कौतुक

विवाहस्थळी ख्यातनाम रांगोळी कलाकार मल्लिनाथ जमखंडी यांनी स्व. विष्णुपंत कोठे यांचे चार बाय आठ आकारात रांगोळी साकारली होती. त्यांच्या या कलाकृतीचे सोलापूरकरांनी कौतुक केले.
———

सुमधुर संगीताची जोड

विवाह सोहळ्याच्या उत्साहाला सुमधुर संगीताचीही जोड मिळाली. पद्मश्री संगीत विद्यालय प्रस्तुत ‘सुर तेची छेडिता’ हा कार्यक्रम साक्षी देवस्थळी, स्नेहल जोशी यांनी सादर केला. यावेळी त्यांनी विविध मराठी, तेलगू, हिंदी गीते सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.