गावगाथा

अक्कलकोटची अग्रणी बँक ऑफ इंडिया ‘कोंबड्याचे खुराडे’; जागेअभावी ग्राहक व कर्मचाऱ्यांचे हाल, शाखेच्या स्थलांतराची मागणी

बँक

अक्कलकोटची अग्रणी बँक ऑफ इंडिया ‘कोंबड्याचे खुराडे’; जागेअभावी ग्राहक व कर्मचाऱ्यांचे हाल, शाखेच्या स्थलांतराची मागणी
​अक्कलकोट (प्रतिनिधी) :
तालुक्याची अग्रणी बँक असलेल्या ‘बँक ऑफ इंडिया’च्या अक्कलकोट शाखेची जागा अत्यंत तोडकी पडत असून, ग्राहकांची गर्दी आणि अपुऱ्या जागेमुळे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन बँक सुसज्ज इमारतीत स्थलांतरित करावी, अशी तीव्र मागणी पुढे येत आहे.
​बँक ऑफ इंडियाची ही शाखा शहरातील गजबजलेल्या ए-वन चौकात कार्यरत आहे. बँकेचे नियमित ग्राहक, तसेच शासकीय व निमशासकीय योजनांच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांची येथे दररोज मोठी गर्दी असते. मात्र, बँकेत पुरेशी जागा नसल्याने ग्राहकांची मोठी तारांबळ उडते.
​तासन् तास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे आणि गर्दीचे नियोजन कोलमडल्यामुळे कर्मचाऱ्यांकडूनही ग्राहकांना चिडचिडपणाची वागणूक मिळत आहे. यात विशेषतः वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत आहेत. बँकेत बसण्यासाठी बाकडे, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. पूर्वीच्या बँक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ही छोटीखाणी जागा स्वीकारावी लागली, असा आरोपही ग्राहकांतून केला जात आहे.
​दरम्यान, ए-वन चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या शाखेतील गर्दीचा फटका बाहेरील मुख्य रस्त्यावरील रहदारीला बसत आहे. बँकेबाहेर वाहनांची अस्ताव्यस्त गर्दी होत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या राष्ट्रीयकृत बँकेच्या विस्कळीत कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
​चौकट :
​सुसज्ज जागा असावी, अन्यथा ग्राहक मंचात दाद मागणार!
​”तालुक्याची अग्रणी आणि ‘ग्राहक प्रिय’ बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ इंडियाच्या अक्कलकोट शाखेचे आज ‘कोंबड्याचे खुराडे’ झाले आहे. ग्राहकांना आवश्यक मूलभूत सुविधा देणे बँकेचे कर्तव्य असताना त्या दिल्या जात नाहीत. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारणे गरजेचे आहे. बँक प्रशासनाने ही शाखा तात्काळ सुसज्ज इमारतीत न हलविल्यास ग्राहक मंचाकडे दाद मागावी लागेल.”
​— प्रा. चंद्रकांत पाटील, बसलेगांव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button