वागदरी जिल्हा परिषद गटात काँग्रेसला मोठे खिंडार; आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
अक्कलकोट | प्रतिनिधी —– अक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा वागदरी जिल्हा परिषद गट काँग्रेससाठी हादरवून टाकणारा ठरला आहे. वागदरी परिसरातील काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते व प्रमुख नेत्यांनी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या प्रभावी नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या घटनेमुळे वागदरी गटात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून भाजपाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. वागदरीसारख्या परंपरागत काँग्रेसच्या प्रभावी भागात घडलेल्या या घडामोडीने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये
वागदरीचे माजी सरपंच रवी किरण वरनाळे, डॉ. शरण वरनाळे, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, शिवराज मंत्री पोमाजी, अल्पसंख्यांक समाजातील नेते इस्राईल नदाफ, माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य विजय ढोपरे, शंकर घुगरे, विकास नंजुडे, सिद्धारूढ धड्डे, श्रीशैल पोमाजी, सुभाष शिरगण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, अप्पू बिराजदार यांच्यासह वागदरी जिल्हा परिषद गटातील असंख्य प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी म्हणाले,
“वागदरी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करू.”
दरम्यान, काँग्रेसमधून होत असलेले सततचे पक्षांतर आणि कार्यकर्त्यांची गळती पाहता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप अधिक भक्कम स्थितीत जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. वागदरी गटातील या मोठ्या राजकीय घडामोडीकडे संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!