आजकालच्या 5G च्या जमान्यात पत्र लेखन दुर्मिळ आहे, म्हणून माझे अब्बा आणि आप्पिला जुने दिवस आणि सध्याचे दिवस आठवले म्हणून लिहिलेले पत्र….
पञ लेखन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/FB_IMG_1670748951247-780x470.jpg)
आजकालच्या 5G च्या जमान्यात पत्र लेखन दुर्मिळ आहे, म्हणून माझे अब्बा आणि आप्पिला जुने दिवस आणि सध्याचे दिवस आठवले म्हणून लिहिलेले पत्र….
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-02-at-18.19.09_889e4579.jpg)
अब्बा आप्पी पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार,
अस्सलाम वालैकूम.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
पत्र लिहिण्यास कारण की,मी पुण्यात ठीक आहे,तुमची खूप आठवण येत आहे.
परवा गावातील एका माणसा कडून कळले की आपल्या ऊसाला तोड आली आहे,ऐकून खूप आनंद झाला.
अब्बा तुम्ही तुमच्या परिवारासोबत मुंबई मध्ये केलेला संघर्ष,त्यानंतर तुम्ही कामा निमित्त परदेशात गेलात,तिथं भोगलेला संघर्ष,तुमच्या परस्पर आप्पी ने भोगलेला संघर्ष,भैया चा लहान पणी अक्सिडेंट, त्या नंतर परदेश वारी ते दुसऱ्याच्या शेतात तब्बल 14 वर्ष डायरेक्ट चाकरी , बहिणीच लग्न आणि त्यात झालेला तो राडा आणि आत्ताच अलीकडचा काळ डोळ्यासमोर आणला आणि लक्षात आले की अब्बा आणि आप्पी आपल्या ऊसाला आलेली तोड ही काय साधी सुधी नाहीये.
अब्बा आपण जेव्हा चाकरी होतो तेव्हा दुसऱ्याच्या रानात दहा दहा एकर ऊसाला तुम्ही पाणी द्यायचात,त्याला ऊन वारा पाऊस काही न पाहता लाग लागवड करायचात,आपल्या पदरी शेत असून त्यात कासण्याची आपली दानत न्हवती,आज एकाचा तर उद्या दुसऱ्याचा,उद्या दुसऱ्याचा तर परवा तिसऱ्याच बांध आप्पी खुरपणी साठी रानोमाळ हिंडायची,मला आठवतंय जेमतेम 20 रुपये पगार तेव्हा आप्पी ला भेटायचा तो हो पूर्ण दिवस राबल्यावर.😢अब्बा तू तर सालगडी! वर्षाला केवळ 12 हजार मध्ये तब्बल सतरा वर्षे राबलास!😢
अब्बा तेव्हा तू रानात सकाळी दिस उगवल्यापसून ते रात्री सूर्य मावळतीला जाई पर्यंत रबायचास,इमाने इतबारे तुझ्या कष्टाने मालकाचे रान हिरवा शालू पांघरूण नटून जायचं. पण,तुला आणि आप्पी ला राहून राहून वाटायचं की आपली भी शेती फुलवली जावी, पण बोट दगडाखाली घावल्याने तुम्ही मर मर करण्याशिवाय काहीच करू शकत न्हवता हे सत्यच म्हणाव लागेल.
पण अब्बा गेल्या दोन वर्षात आपल्या शेतात गहू,कांदे,उडीद,आणि आता ऊस अशी पीक डोलायला लागली आहेत. आणि त्यातून भरघोस म्हणणार नाही पण रानाच्या हिशोबाने खूप चांगले उत्पादन निघत आहे हे पाहून आज आमची छाती अभिमानाने फुगते आहे. अब्बा तुमचा आणि आप्पीचा संघर्ष आता कुठे आनंदोत्सव साजरा करण्यास सज्ज होत आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक संघर्षाला आता सोनेरी झालर पांघरूण आता नाचावे लागणार आहे. तुम्ही भोगलेल्या प्रत्येक यातनेला आता आपली जखम भरली म्हणून आनंदाचा धिंगाणा घालवा लागेल.आप्पी मला आठवते आहे तुझे वाक्य,
आपल्याला भी गावाकडे रान आहे,पण खूप कष्ट करावे लागेल त्या साठी,आप्पी! आग तू भोगलेल्या आणि जगलेल्या प्रत्येक वाक्याला जरा आठवून बघ! आज तुम्ही केलेलं कष्ट आणि भोगलेला संघर्ष आज सोनेरी पहाट घेऊन तुमच्या दरात सज्ज आहे!🤲🏻😔
अब्बा तुम्ही,आपण चाकरी करत असताना,मालकाच्या ट्रॅक्टर ला,त्याच्या उसाच्या फडातला एक कांडक ऊस कधी खलला नाहीत,कधी त्या ट्रॅक्टर वर बसला नाहीत,तुम्ही डिझेल मेकॅनिक होतात,तो खराब झालेला ट्रॅक्टर रिपेअर केलात पण कधी,त्याला चालवण्याची इच्छा सुद्धा कधी व्यक्त केली नाहीत,एवढे कसे हो तुम्ही त्याग करू शकता ह्या सगळ्यांचा!😢😭
मला आठवते तुम्हाला एकदा वाटेगाव मधून काही तरी कामा निमित्त आपल्या गावाला, म्हणजेच मोट्याळ ला यायचे होते, तेव्हाचे आपली मालक तात्यांनी तुम्हाला ५०० ची नोट दिली होती,एका उसाच्या फडातला पाला सरताना,तुम्ही ती नोट कामाच्या गडबडीत तशीच कोणत्या तरी खिशात ठेवली,दिस मावळला,तुम्ही घरी आलात, आप्पी ला म्हणालात!
मला तात्याने पैसे दिले आहेत,मी गावाला जाऊन येतो,अस म्हणत म्हणत तुम्ही खिशात हात घातलात,ती नोट खिशात न्हवती😢, आप्पी कडे पाहत तुम्ही म्हणालात,बहुतेक पडली वाटत फडात, आणि हे ऐकताच तुम्ही,आप्पी,मी बहिण सगळे जण उसाच्या फडाकडे धावलो, घासलेट ची चिमणी घेऊन आपण ऊसाचा अख्खा पाला पिंजून काढला पण आपल्याला नोट नाही सापडली😢, अब्बा तुमचे गावाकडे जाण रद्द झाले,पण ते पाचशे रुपये फेडायला तुम्हाला महिना लागला! कसले नशीब ओ माय बाप आपले तेव्हा😔😢. पण एव्हढ घडून सुद्धा तुम्ही डगमगला नाहीत,भैया तेव्हा म्हणालेला,जाऊ दे पैसे मी उसाच्या वाकुऱ्या तोडून पैसे देतो,पण अब्बला गावाला जाऊ दे,हा भैया चा आधार तेव्हा लाख हत्तींच बळ देऊन जायचा.
एकदा ओढ्याच्या पलीकडे ऊसाची लावणं करताना अब्बा तुमचं आणि आप्पीच भांडण झालं,तुम्ही आप्पिला उसाच्या वाड्याने मारले होते,मी ऊस खात खत रडत होतो,पण ते तुमचं ते कष्ट आठवलं की आज लक्षात येतंय ते दिवसभर जनावर बघून ऊसाच्या लावणीत येणं आणि भलताच राग कुठे तरी काढायचा म्हणून आप्पिला बडवण! बर हा मार खात असताना तुमचं मनात साठलेले दुःख आणि राग सहन करून तो मार गपगुमान खाणारी आप्पी आज ही मला याद आहे😭😢.
खूप काही लिहिता येईल!पण तूर्तास थांबतो.
अब्बा आणि आप्पी आता आपला सगळा ऊस गेला ना ह्यंदा तुम्हाला त्या पैशाचे काय करायचे ते तुम्ही करा.आता तुम्ही मालक आहेत.पुढच्या वर्षी ट्रॅक्टर घेण्याचा मानस आहे,लवकरच गावाकडे येणार आहे,पत्र मिळाले की कळवा,
रुक्साना मावशीची तब्बेत कशी आहे,तिला ही माझा नमस्कार कळवा,थोड्याच दिवसापूर्वी मालन दादी गेली!😭 त्यामुळे रजाक चाचा आणि त्यांच्या कुटुंबाकडे पण लक्ष ठेवा, त्यांनाही सप्रेम नमस्कार, अब्बा रात्री रानात जाताना बॅटरी घेऊन जात जावा.आणि हो अब्बा लवकरच गुरुवारच्या प्रत्येक घरातून आणलेल्या भाकरी खाण्यासाठी पूर्ण परिवार घेऊन मी कायमचा तुमच्या कडे येणार आहे,तुमच्या सानिध्यात.
कळावे तुमचा मुलगा
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
तजमुल….👏🏻❣️
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
नंदे सर ❣️🤲👏👍