Akkalkot : खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला ; १८ तासांत खूनाचा उलगडा ; तीन आरोपी अटकेत

अक्कलकोट, दि. ७ ऑगस्ट : अक्कलकोट उत्तर पोलिसांनी अवघ्या १८ तासांत खून प्रकरणाचा छडा लावत तीन संशयितांना अटक केली आहे. किरकोळ भांडणातून तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी गोरक्षशंकर भरमशेट्टी यांच्या शेतीतील विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढल्यानंतर सोशल मीडियाच्या मदतीने त्याची ओळख सागर श्रीशैल व्हनचेंजे (वय २७, रा. दहिटणेवाडी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी पटली.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय खबर आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १८ तासांत खुनाचा उलगडा केला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी सागर व्हनचेंजे याचा श्रुती यारोळे, नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्याच वादातून १ ऑगस्टच्या रात्री तिघांनी संगनमत करून सागर व्हनचेंजे याला दारू पाजून शेतीत नेले. तेथे लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकण्यात आला.
या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(2), 238(3), 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अक्कलकोट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


