स्वामींची भूमिका साकारणे जीवनातील मोठे आव्हान – अभिनेते मोहन जोशी
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१/११/२२) आज पर्यंत आपण विविध मराठी हिंदी चित्रपटात व नाटकात काम केलेले आहे. तो अनुभव माझ्या आजवरच्या सिनेसृष्टीच्या जीवनातील कारकिर्दीस पाठीशी होताच, परंतु जेव्हा गतकाळात प्रदर्शित झालेला आध्यात्म व विज्ञानावर आधारित असलेला देऊळ बंद या चित्रपटात स्वामींची भूमिका साकारण्याची संधी चालून आली, त्यावेळी माझ्या जीवनातील हे सर्वात आव्हानात्मक कार्य होते. कारण आजवर विविध पात्राच्या माध्यमातून आपण नाट्य अभिनय करू शकलो
परंतु स्वामींच्या चरित्रावर व त्यांच्या भूमिकेत अभिनय करणे हे सर्वात कठीण कार्य होते, त्यामुळे देऊळ बंद या चित्रपटात स्वामी समर्थांची भूमिका साकारणे हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे आवाहन होते असे मनोगत जेष्ठ प्रसिद्ध मराठी व हिंदी सिने कलाकार व नाट्य कलाकार मोहन जोशी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी मोहन जोशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन याथोचित सन्मान केला.
याप्रसंगी मोहन जोशी बोलत होते. पुढे बोलताना जोशी यांनी मीही एक निस्सीम स्वामीभक्त आहे, त्यामुळेच देऊळ बंद चित्रपटात साकारलेली माझी भूमिका भाविकांच्या विशेष करून स्वामी भक्तांच्या स्मरणात कोरली गेलेली आहे. स्वामी समर्थांचे अवतार घेऊन त्यांची भूमिका पार पाडणे एका स्वामी भक्तासाठी यापेक्षा मोठे स्वामींचे आशीर्वाद काय असू शकते असेही प्रतीप्रश्न त्यांनी याप्रसंगी भाविकांना केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, नाट्य निर्माते राजन मोहाडीकर, नितीन मसरूळकर, दीपक लोंढे, अजित पिंगुळकर, रिटायर्ड एस.पी.अशोक भालेराव, सचिन किरनळळी, उद्योगपती सुभाष जाधव, विपूल जाधव, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.