धम्मभूमीत जनजागृतीची सायकल यात्रा : भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली धम्मप्रसार अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक पदयात्रा


धम्मभूमीत जनजागृतीची सायकल यात्रा : भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली धम्मप्रसार अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी – सुदाम कांबळे

पंढरपूर | ताडोबा अभयारण्यातील भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या सामाजिक क्रांती अभियाना अंतर्गत एक प्रेरणादायी धम्मपदयात्रा व सायकल यात्रा नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. “चालती दिंडीत श्रावक भिक्खू वंदना गात, बुद्ध-धम्म-संघ म्हणती, उरात श्रद्धा वाहत” – अशा घोषात संपूर्ण मार्ग दुमदुमला होता. पंढरी नगरी नवबौद्धांच्या श्रद्धेने उजळून निघाली होती.


ही भव्य यात्रा २२ जून २०२५ रोजी शौर्यभूमी भीमा कोरेगाव येथून सुरू होऊन, ३ जुलै २०२५ रोजी धम्मभूमी पंढरपूर येथे समारोप झाला. यात्रेच्या मार्गात विविध गावांमधून संविधान जनजागृती, पर्यावरण संदेश, आणि सामाजिक समतेचे महत्व पटवून देण्यात आले. “संविधान व धम्मविचारांचा प्रचार सायकलवरून, लोकजागृतीच्या ध्यासाने” हा अनोखा उपक्रम समाजात नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला.
या अभियानात आयुष्यमान रावसाहेब घोडके (श्रीगोंदा) यांनी धम्मप्रसारक म्हणून विशेष कार्य केले. त्यांच्या सायकलवरील संदेशांनी हजारो नागरिकांमध्ये संविधानिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली.
यात्रेचे प्रमुख संयोजक म्हणून मा. डी.पी. भोसले (पुणे), मा. सोमनाथ भोसले (सोलापूर), मा. रामदास जगताप (पुणे), मा. राजेंद्र गवदे (कोरेगाव), व मा. रोहित जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. यांच्याच मार्गदर्शनामुळे ही यात्रा सुव्यवस्थित, सुसंगत व प्रभावी झाली.
ही धम्मपदयात्रा म्हणजे बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाने चालणाऱ्या अनुयायांची श्रद्धायात्रा होती. यातून धम्म, संविधान व पर्यावरण यांचा संदेश देत नवबौद्ध समाजाचा सामाजिक सहभाग अधिक ठळकपणे समोर आला.