
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्टस् क्लबची राज्यस्तरीय यशाची उज्वल कामगिरी
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
नुकत्याच नान्नज, बोरामणी येथील कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्टस् क्लबने क्रॉस कंट्री स्पर्धेतही आपला डंका वाजवला आहे. रत्नागिरी येथे आयोजित १९ वर्षीय गटातील क्रॉस कंट्री स्पर्धेत कु. ज्योती बन्ने हिने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावत राज्यात आपली दमदार छाप पाडली असून, आगामी हरियाणा राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
तिच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षीय कक्षात, क्लबचे अध्यक्ष व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन ज्योती बन्ने हिचा गौरव करण्यात आला. यावेळी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी तिचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गेल्या ३८ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना घडविण्याचे मोलाचे कार्य न्यास सातत्याने करत असून, ज्योती बन्ने हिच्या यशामुळे क्लबची राज्यस्तरीय कामगिरी आणखी उजळली आहे.
कु. ज्योती बन्ने हिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून क्लबच्या खेळाडू घडविण्याच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. या गौरवप्रसंगी मार्गदर्शक प्रदीप राठोड, सचिन कुर्ले, शशिकांत अस्वले, बसवराज फुलारी, संदीप विभूते तसेच क्लबचे सदस्य, अन्नछत्र मंडळाचे सेवेकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



