बदलत्या हवामानानुसार उस उत्पादन वाढीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न….
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे येथे “बदलत्या हवामानानुसार उस उत्पादन वाढीचे अद्ययावत तंत्रज्ञान” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेचा उद्घाटन आज बुधवार दिनांक ३०/०७/२०२५ रोजी मा. डॉ. पी. एल. पाटील, कुलगुरू, कृषी विद्यापीठ, धारवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. एस. सोलोमन, माजी कुलगुरू, चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठ, कानपूर व माजी संचालक, भारतीय उस संशोधन संस्था, लखनौ, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. इंद्रजीत मोहिते, सदस्य नियामक मंडळ व्ही.एस.आय., पुणे तसेच सल्लागार मा. श्री. शिवाजीराव देशमुख हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून उपस्थितांचे स्वागत संस्थेचे महासंचालक श्री. संभाजी कडुपाटील यांनी केले. मा. महासंचालक यांनी संस्थेमध्ये सुरु असलेल्या विविध संशोधनपर कार्यक्रमाची थोडक्यात माहिती विशद केली. यामध्ये ऊस प्रजनन केंद्र, अंबोली येथे सुरु असलेल्या उसाच्या जातींची निर्मितीचा उल्लेख, उसाचे उत्तम प्रतीचे बेणे पुरवठा इत्यादी विषयांचा उल्लेख केला. तसेच त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात विशद केली. चर्चासत्राच्या पुस्तकाचे विमोचन संस्थेचे सल्लागार मा. श्री. शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
डॉ. पी. एल. पाटील यांनी उद्घाटनपर भाषणामध्ये उस हे पीक राष्ट्रीय विकासात महत्त्वाचा कणा असल्याचे नमूद केले. साखर उद्योगावर हजारो शेतकरी, कर्मचारी अवलंबून आहेत. तसेच त्यांनी ज्यादा पाण्याचा वापर, असंतुलित व अवेळी देण्यात येणाऱ्या खत मात्र,सेंद्रिय व जैविक खत वापराचा अभाव इत्यादी कारणांमुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता खालावत असल्याचे नमूद केले. त्यामुळे उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा कमी होत असल्याचे सांगितले. उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा वाढविण्यासाठी संशोधन संस्था, साखर उद्योग व शेतकरी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा वाढविण्यासाठी सेंद्रिय, रसायनिक व जैविक खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर, योग्य प्रमाणात पाणी देणे, पाण्याचा ताण व जमीनीतील क्षारता सहन करणे—या ऊस जातींची लागवड, हिरवळीचे खतांचा वापर, पीक फेरपालट इत्यादी उपायांचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढीसाठी निश्चितपने मदत होईल असे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. एस. सोलोमन यांनी आपल्या भाषणात पावसाच्या अनियमितपनामुळे उसाचे सरासरी उत्पादन व साखर उतारा कमी होत असल्याचे नमूद केले. पुढील काळामध्ये वातावरणातील बदल तसेच अवर्षण परिस्थितीमुळे उसाचे उत्पादन कमी होत जाईल याचा त्यांनी उल्लेख केला. यावरिल उपाय म्हणून बदलत्या हवामानात दुष्काळ परिस्थितीमध्ये तग धरणाऱ्या, उसाच्या नवीन जाती, रोग व कीड प्रतिबंधक उसाच्या जाती तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य प्रमाणात पाणी व खत व्यवस्थापन करून जमीनीची सुपीकता टिकून ठेवणे, सेंद्रिय व जैविक खताचा तसेच रासायनिक खतांचे व्यवस्थापन इ. गोष्टींचा अवलंब केल्यास उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होईल असे त्यांनी नमूद केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या संशोधनपर कार्यक्रमाची माहिती दिली. संशोधनपर तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर केल्यास उसाचे सरासरी उत्पादन वाढविने शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये विविध विषयांचे संशोधनपर लेख सादर होणार आहेत. संस्थेमध्ये विविध उत्पादने, उस तोडणी यंत्र प्रसारित करण्यात आले आहेत. भारतातील विविध संस्थांच्या संशोधनाचे लेख सादर करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रमामध्ये भारतातील विविध संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ, कारखान्याचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्रातील विविध कारखान्यांचे कृषी अधिकारी व उस विकास अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!