वागदरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भग्नावस्थेत : विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांचे शिक्षण व सुरक्षितता धोक्यात आली आहे.
शाळेतील शौचालये व मुतारी पूर्णपणे अस्वच्छ झालेली असून दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याच्या टाकीचे पत्रे उडाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्गखोल्यांमध्ये चुन्याचे व दगडांचे तुकडे पडल्याने मुलांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
भिंती व छप्पर अत्यंत जिर्णावस्थेत असून ते कधीही कोसळतील, अशी भीती व्यक्त होत आहे. शाळा परिसरात सर्वत्र कचरा व अस्वच्छता असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
आधीच शिक्षकांची कमतरता भासत असताना अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिकवणे ही मोठी समस्या बनली आहे. शासन एकीकडे मराठी शाळा वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र प्रत्यक्षात शाळांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव वागदरी शाळेच्या अवस्थेतून स्पष्ट होत आहे.
गावातील पालक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधले असून शाळेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.