_उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी_
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा-उपमुख्यमंत्री
पुणे, दि.१४ सप्टेंबर : (जिमाका वृत्तसेवा): शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
श्री. पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्थळ पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, खराडी ते केशवनगर पुलाचे काम करतांना अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य वापरावे. या पुलामुळे चंदननगर, केशव नगर, खराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असल्याने कामे गतीने पूर्ण करावे.
या भागातील नागरिकांनी पाणी, रस्ते, पथदिवे, कायदा व सुव्यवस्था, बसेस व्यवस्था आदींच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या असता त्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.
मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन, पीएमपीएल, लोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना श्री. पवार यांनी केली.
000
Back to top button
×
No WhatsApp Number Found!