गावगाथा

पोमू राठोड यांची संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष समारोह समितीच्या सहकार्यवाहपदी निवड

निवड नियुक्ती

पोमू राठोड यांची संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष समारोह समितीच्या सहकार्यवाहपदी निवड
पुणे | प्रतिनिधी
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, या उपक्रमांच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष समारोह समितीच्या सहकार्यवाहपदी प्रख्यात सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते पोमू राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
समिती प्रमुख डॉ. मुरहरी केळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्तरावर गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये दहा ‘संत गाडगेबाबा प्रबोधन परिषद’ आयोजित करण्यात येणार असून, त्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांची विस्तृत मालिका राबविण्यात येणार आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. त्यांच्या या विचारांचा जागर समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर पोमू राठोड यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विविध प्रबोधनपर उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि समाजपरिवर्तनासाठीची सातत्यपूर्ण बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोमू राठोड यांनी ग्रामीण व शैक्षणिक क्षेत्रात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले असून, युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या अनुभवाचा लाभ समितीच्या राज्यव्यापी उपक्रमांना होणार असल्याचा विश्वास समिती चे निमंत्रक सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधन क्षेत्रातील मान्यवरांनी पोमू राठोड यांचे अभिनंदन केले असून, गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी त्यांच्या कार्यकौशल्याचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या प्रबोधन चळवळीमुळे समाजात स्वच्छता, समता, विवेक, शिक्षण आणि मानवतेची मूल्ये अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button