गावगाथा

“रक्ताचं नातं, पिढ्यांचं बंधन” जपत चाबुकस्वार परिवाराचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

आसरा चौक येथील आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयात आयोजित चाबुकस्वार परिवाराच्या स्नेहमेळाव्यात उपस्थित परिवार सदस्य.

“रक्ताचं नातं, पिढ्यांचं बंधन” जपत चाबुकस्वार परिवाराचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

सोलापूर : कुंभारी, कर्देहळी, वांगी, शेगाव, केगाव आणि होटगी येथील चाबुकस्वार परिवाराचा भव्य स्नेहमेळावा रविवारी आसरा चौक येथील आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. “रक्ताचं नातं, पिढ्यांचं बंधन” या प्रेरणादायी ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास परिवारातील शेकडो बंधू-भगिनी सपरिवार उपस्थित होते.


जिल्ह्यात प्रथमच केवळ परिवाराच्या सर्वांगीण विकास, एकोप्याची जपणूक आणि भावी पिढ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला सर्व चाबुकस्वार परिवाराचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी परिवारातील ज्येष्ठ सदस्यांचा फेटा, शाल, श्रीफळ आणि आधारासाठी आधुनिक काठी देऊन सत्कार करण्यात आला. ज्येष्ठांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांनी ज्येष्ठांना मानवंदना देत त्यांचे आशीर्वाद घेतले.
मेळाव्याची प्रस्तावना प्रकाश चाबुकस्वार यांनी केली. सूत्रसंचालन जीवन चाबुकस्वार यांनी प्रभावी आणि ओघवत्या शैलीत केले.
यावेळी परिवारातील यशस्वी उद्योजक सिद्धाराम चाबुकस्वार यांनी उद्योजकता, स्वावलंबन आणि जीवनातील यश याविषयी मार्गदर्शन केले. यशस्वी होण्यासाठी चिकाटी, प्रामाणिकपणा आणि मेहनत या गुणांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी युवकांना “नोकरी शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हा” असा संदेश दिला.
युवकांसाठी सचिन चाबुकस्वार यांचे करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शनपर भाषण झाले. बदलत्या काळात शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे महत्त्व त्यांनी विशद केले.
अंबादास चाबुकस्वार यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत “शिक्षणाशिवाय पर्याय नाही” असे ठामपणे सांगितले. तसेच चाबुकस्वार परिवारातील उपवर मुला-मुलींसाठी लवकरच सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेला उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ. सुमनताई जीवन चाबुकस्वार होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी परिवारातील सर्वांनी संघटित होऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. “एकीमध्येच शक्ती आहे. सर्वांनी एकत्र येऊन परिवाराचा आणि समाजाचा विकास साधला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
या भव्य स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीचे सदस्य तुकाराम चाबुकस्वार, कैलास चाबुकस्वार, संदीपान चाबुकस्वार, बनसिद्ध चाबुकस्वार, पराग चाबुकस्वार, सुभाष चाबुकस्वार, चंद्रकांत चाबुकस्वार, दत्तराज चाबुकस्वार आदींनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कैलास चाबुकस्वार आणि दिनेश चाबुकस्वार यांनी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
मेळाव्याची सांगता सामूहिक भोजनाने झाली. आभार प्रदर्शन दत्तराज चाबुकस्वार यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी परिवारातील नाती अधिक दृढ करण्याचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत हा स्नेहबंध टिकवून ठेवण्याचा संकल्प केला.
छायाचित्र ओळ : आसरा चौक येथील आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयात आयोजित चाबुकस्वार परिवाराच्या स्नेहमेळाव्यात उपस्थित परिवार सदस्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button