गावगाथा

अक्कलकोट बसस्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

अक्कलकोट नगरी बातमी

अक्कलकोट बसस्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ठराव मंजूर; सकल मराठा समाजाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

अक्कलकोट, प्रतिनिधी : राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा ठराव आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास येत असल्याने अक्कलकोट शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.
या निर्णयाबद्दल जुने तहसील कार्यालय, नेहरू गल्ली येथील आमदार कार्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘जय भवानी, जय शिवराय’च्या जयघोषाने आमदार कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.
नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज तथा बंटी राठोड तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसस्थानक परिसरात उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करणारे नगरसेवक तम्मा शेळके यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने मनाचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात येत असल्याने अक्कलकोटकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा हा पुतळा अक्कलकोटच्या वैभवात भर घालणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचे आभार मानण्यात आले. पुतळा उभारणीसाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व पराक्रमाची आठवण सदैव जागवणारा हा निर्णय अक्कलकोट शहर व तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार असून, शिवरायांच्या विचारांची आणि स्वाभिमानाची ज्योत सदैव तेवत राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button