अक्कलकोट तालुक्यात खरिपावर दुष्काळाचे सावट गडद!
दुष्काळाच्या छायेत वाढली जगण्याची चिंता; पावसाअभावी शेती संकटात, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

अक्कलकोट तालुक्यात खरिपावर दुष्काळाचे सावट गडद!
दुष्काळाच्या छायेत वाढली जगण्याची चिंता; पावसाअभावी शेती संकटात, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले
वागदरी : अक्कलकोट तालुक्यातील सीमेलगतच्या भागात यंदाच्या खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट झाली आहे. वरुणराजा कधी प्रसन्न होणार, याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पुढे चांगला पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडीद, सोयाबीन यासह विविध खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके आता वाळू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाअभावी खरीप पिके धोक्यात
अक्कलकोट तालुक्यातील सीमाभागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीची परिस्थिती गंभीर बनली आहे. सुरुवातीच्या पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता पिके जगविण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा थेंबही नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तूर, मूग, उडीद, सोयाबीन यासह विविध पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणी, बियाणे, खत आणि मशागतीसाठी केलेला खर्चही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
उसालाही फटका; जनावरांसाठी चाऱ्याची चिंता
पाण्याअभावी ऊस पिकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नसल्याने ऊस पीक वाचविणे कठीण झाले आहे. परिणामी काही ठिकाणी उभा ऊस जनावरांसाठी चारा म्हणून वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शेती संकटात असतानाच बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. शेतीतून उत्पन्न नाही आणि दुसरीकडे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर वाढत असल्याने ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शेतकरी दुहेरी-तिहेरी संकटात
पावसाचा लहरीपणा, खरीप पिकांचे संकट आणि वाढती महागाई अशा तिहेरी संकटाचा सामना शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. पाऊस न झाल्यास केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांपासून छोट्या व्यावसायिकांपर्यंत अनेक घटकांना याची झळ बसू शकते.
तातडीने मदतीची शेतकऱ्यांची मागणी
शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या भागांचे तातडीने सर्वेक्षण करावे. पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई, आर्थिक मदत, आवश्यक त्या सवलती तसेच रोजगारनिर्मितीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.
तसेच वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून गरीब व गरजू कुटुंबांना तातडीने दिलासा द्यावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.
“पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरणी केली; मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने पिके वाळू लागली आहेत. आता पाऊस झाला नाही तर मोठे नुकसान होणार आहे,” अशी चिंता वागदरी येथील शेतकऱ्यांनी ‘गावगाथा मीडिया नेटवर्क’शी बोलताना व्यक्त केली.
यावेळी धोंडप्पा यमाजी, चंद्रकांत कणसे, सिद्धाराम भरमदे, विजयकुमार निंबाळे आणि परमेश्वर कणमुसे या शेतकऱ्यांनी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा असल्याचे सांगितले.
आता वरुणराजा कधी बरसणार आणि कोमेजत चाललेल्या खरीप पिकांना जीवदान मिळणार का, याकडे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


