PCMC : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना जबर धक्का ; शहराध्यक्ष अजित गव्हाणेंचा राजीनामा
निगडी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज (दि.१६) शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे गव्हाणे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. गव्हाणे यांच्यासोबत पंकज भालेकर, राहुल भोसले, यश साने या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची समर्थक माजी नगरसेवकांसह काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्याचवेळी गव्हाणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच गव्हाणे यांनी आज शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनीही राजीनामे दिले आहेत.
दरम्यान येत्या शनिवारी २० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पिंपरी मध्ये मोठा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या वेळी अजित गव्हाणे त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.