*सचिन बेंडभर यांची उत्कंठावर्धक आगामी कादंबरी : जोजो*
बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांनी साहित्य क्षेत्रात विपुल लेखन केले आहे. साहित्याच्या जवळपास सर्वच प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. कथा, कविता, कादंबरी, अनुवाद, संपादन, समीक्षा या प्रकारात त्यांनी पन्नास पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ते एक प्राथमिक शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात मुलांसाठी उपयुक्त असणारे लेखन आहे.शाळेतील मुलांचे बालमानसशास्त्र त्यांना चांगले माहीत आहे. त्याचा विचार करून त्यांनी एक भावस्पर्शी जोजो ही बालकादंबरी लिहली आहे. माणूस आणि पक्षी यांचे एक वेगळे नाते यात दाखवले आहे. कोरोना काळ सुरु असतो. अचानक जोजो नावाचा एक कॉकटेल पक्षी जखमी अवस्थेत विवेकच्या दुकानाच्या समोर येतो. विवेक तो पक्षी घरी आणतो. तो पक्षी जेव्हा घरी आणला जातो तेव्हा त्याची बायको अनन्या, मुलगा रोहन, मुलगी आरोही यांना खुप आनंद होतो. ते त्याच नाव जोजो असं ठेवतात.त्यांचे चौकोनी असणारे कुटुंब जोजोच्या रूपाने पंचकोणी होते. कोरोना काळ आणि जोजोचा घरात होणारा प्रवेश हा एक आनंदादायी सोहळाच झालेला असतो. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून लेखकांनी तो मांडला आहे. मानव आणि प्राणी, पक्षी यांच्यातील एक हळव प्रेमळ नातं यात लेखकांनी खुलवलं आहे.
एका पक्षाशी माणसाचे नाते किती घट्ट असू शकते याची प्रचिती यातील छोटे छोटे प्रसंग वाचून येते. अनन्या मुलांना घेऊन माहेरी गेल्यावर विवेक आणि जोजो हे दोघेच घरी राहतात. नेहमी दिसणारी माणसं कुठे गेली असावी? असं जोजोला वाटत. तो नाराज होतो, उदास होतो, काहीच खात नाही. एकूणच पशु, पक्षी यांनाही भावना असते, प्रेम, आपुलकी असते याची प्रचिती यातून येते. लेखकांनी कादंबरी लिहीत असताना जसा माणूस मानवी जीवनात वेगवेगळ्या आधुनिक साधनांचा वापर करतो, तसा वापर करून प्राणी आणि पक्षी यांच्या नात्यात प्रेम निर्माण करण्यासाठी त्याचा वापर केला आहे. जोजोला मुलांचा विरह जाणवतो, त्यावेळी विवेक व्हिडीओ कॉल करून जोजो आणि मुलांची भेट घडवून आणतो. बदलत तंत्रज्ञान याचा वापर अतिशय खुबीने यात केला आहे.
शहरात एखादा पक्षी पाळताना येणाऱ्या अडचणी छोट्या छोट्या प्रसंगाच्या माध्यमातून लेखकाने मांडल्या आहे. या कादंबरीचा काळ कोरोना काळ आहे. या काळातील जीवन यात लेखकाने रेखाटले आहे. यात अनन्याचा वाढदिवस आणि पोलीस हा प्रसंग पोलिसांची एक वेगळी बाजू दाखवतो.
कोरोना काळ हा संपूर्ण देशाच्या दृष्टीकोनातून एक कठीण काळ होता. लोकांचे धैर्य टिकून राहण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत होते. थाळीनाद, दिवे लावणे यासारखे उपक्रम सरकार करत होते. हे काही लोकांना आवडत नव्हते, पटत नव्हते पण याचा एक वेगळा उद्देश होता, ते सांगताना लेखक यांनी विवेक आणि अनन्या यांच्यातील सवांदाच्या माध्यमातून ते खुप चांगल्या पद्धतीने लिहले आहे.
थाळीनाद नंतर त्यांनी दिवे लावणं कार्यक्रम घोषित केला. ते ऐकून सर्वांनाच आनंद झाला. बऱ्याच दिवसाचय रटाळ जीण्यात एक आनंददायी क्षण आला होता. सर्वजण कान देऊन ते ऐकत होते. ते ऐकत असताना अनन्या म्हणाली,
“छान कल्पना आहे बरं का ही?”
“हो. छान तर आहे. पण याने कोरोना थोडीच जाणार आहे!”
विवेकने आपली नाराजी व्यक्त केली.
मग अनन्या त्याला समजावत बोलली,
“अहो, ते फक्त निमित्तमात्र आहे. यातून राष्ट्रीय एकात्मता दिसून येते. आपण सर्व एक आहोत अन् आलेल्या संकटाचा सामना करायचा समर्थ आहोत, हेच यातून दाखवायचंय. अन् दुसरी गोष्ट म्हणजे लॉकडाऊनमध्ये लोकं घरात बसून कंटाळली आहेत. त्यांना कुठेतरी विरंगळा मिळावा, हा या पाठीमागे उद्देश आहे.
कादंबरी लिहताना प्रसंग आणि सवांद याचा खुप चांगला वापर केला आहे. छोट्या छोट्या प्रसंगाच्या माध्यमातून चांगले कथानक फुलवले आहे.जोजोचे खाणं, राहणं, त्याच घर, त्याच संरक्षण, त्याच वागणं हे अगदी सहजपणे लिहले आहेत. एका सामान्य कुटुंब असल्याने हे कथानक अगदी आपले असल्यागत वाटते.
रोहन आणि आरोही या मुलांचे जोजोशी जुळलेले नाते, त्यांच्या भावना, त्याच्याशी झालेली जवळीक अगदी आई, बाबा, पाहुणे मंडळी यांची जोजोशी जवळीक यांचे एक भावनिक वर्णन यात केले आहे. प्रेम दया आणि प्रेम घ्या हा एक मोलाचा संदेश यातून मिळतो. भूतदया कशी असते ती यात सांगितली आहे. या कादंबरीचा शेवट मात्र मनाला चटका लावून जातो.
यात वेगवेगळ्या प्रसंगातून काही मौलिक संदेश दिला आहे. मुलांना त्यांच्या जडणघडणीत नक्कीच त्याचा उपयोग होईल. बालसाहित्यात ही कादंबरी नक्कीच एक वेगळा ठसा निर्माण करेल.
प्रा. कुंडलिक शांताराम कदम
कार्यकारणी सदस्य, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शिरूर. पुणे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!