Talawde : रसायनयुक्त पदार्थांमुळे इंद्रायणी फेसाळली

निगडी (प्रतिनिधी): पिंपरी – चिंचवड साठी वरदायिनी ठरलेली इंद्रायणी नदी आज पुन्हा रसायनयुक्त पाण्यामुळे प्रदुषित झालेली पहायला मिळाली. नदीकाठच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून रसायनयुक्त पदार्थ नदीत सोडले जातात. यावर अनेकदा प्रशासनाने कंपन्यांना सुनावले देखील आहे. मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कंपन्या आपले कृत्य सुरूच ठेवले आहेत. यामुळे या कंपन्यांना अभय कोण देत असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून नद्या प्रदूषित होत आहेत. पिंपरी चिंचवड साठी वरदायिनी ठरलेल्या इंद्रायणी व पवना या दोन्ही नद्यांची दुरावस्था झालेली आहे.

देहु – आळंदीत येणारे हजारो भाविक इंदायणीचे पाणी तिर्थ म्हणून प्राशन करतात, याशिवाय त्याच नदी दररोज स्नान देखील करत असतात. मात्र या दुषित पाण्यामुळे रोगराई पसरत आहेत , याला जबाबदार कोण..? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष वेधून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

मी दररोज चाकण- तळवडे रस्त्यावर असलेल्या इंद्रायणी नदीच्या पुलावरून प्रवास करत असतो. आठवड्यातून दोन ते तीन दिवस मला नदी फेसाळेली दिसते. संतश्रेष्ठींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रायणीची दुरावस्था पाहून मन हेलावून जातो. प्रशासनाने यावर जातीने लक्ष घालून पर्यावरणाचे रक्षण करावे.
दिनेश सोनार, –पर्यावरणप्रेमी