गावगाथा

वागदरी एसबीआय शाखेचे एटीएम बंद; नागरिकांचे हाल

स्थानिक बातमी

वागदरी एसबीआय शाखेचे एटीएम बंद; नागरिकांचे हाल
वागदरी, प्रतिनिधी : वागदरी येथील State Bank of India (एसबीआय) शाखेचे एटीएम बँकेच्या वेळेत म्हणजे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू ठेवले जात असून त्यानंतर ते बंद केले जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वागदरी हे परिसरातील दहा-बारा खेड्यांचे प्रमुख केंद्र आहे. किराणा खरेदी, दवाखाना, मेडिकलमधील औषधे तसेच इतर व्यवहारांसाठी परिसरातील नागरिकांना वागदरी येथे यावे लागते. मात्र गावात जिओ कंपनीचा टॉवर नसल्याने मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर आहे. परिसरातील बहुतांश नागरिकांकडे जिओ सिमकार्ड असल्याने ऑनलाईन व्यवहार, फोनपे किंवा इतर डिजिटल पेमेंट करणे कठीण होते. त्यामुळे रोख रकमेची गरज अधिक भासते.
अशा परिस्थितीत एटीएम केवळ बँकेच्या वेळेतच सुरू ठेवले जात असल्याने सकाळी लवकर, सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी पैसे काढणे शक्य होत नाही. रात्री अचानक कोणाची तब्येत बिघडल्यास दवाखान्यासाठी, किंवा आकस्मिक प्रसंगी किराणा खरेदीसाठी पैशांची गरज भासते; मात्र त्या वेळी एटीएम बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते.
वागदरी हे मुख्य रस्त्यावर असल्याने प्रवासीही येथे थांबून एटीएममधून पैसे काढतात. आसपासच्या परिसरात अन्य कोणतेही एटीएम उपलब्ध नसल्याने या एकमेव एटीएमवरच सर्वांचा भार आहे. यापूर्वी हे एटीएम २४ तास सुरू राहत होते; मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांकडून ते सायंकाळी बंद केले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
परिसरातील नागरिकांनी संबंधित बँक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून एटीएम २४ तास सुरू ठेवावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या अडचणी वाढतच राहतील, अशी भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button