NASA : सुनिता विल्यम्स अंतराळातून परतत असताना लाईव्ह पाहता येणार … ‘नासा’ कडून वेळ आणि तारीख जाहीर…

पुणे (प्रतिनिधी): सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 9 महिन्यांपासून अडकलेले आहेत. मात्र आता बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतणार आहेत.

नासाने त्यांच्या पृथ्वीवर परतण्याच्या तारखेची माहिती दिली आहे. नासाने रविवारी सांगितले की, ‘दोन्ही अंतराळवीर मंगळवार 18 मार्च रोजी संध्याकाळी पृथ्वीवर परततील.’ हे दोघे अमेरिकेतील फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळील पाण्यात उतरवले जातील अशी माहितीही समोर आली आहे.

5 जून 2024 रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात प्रक्षेपण केले. दोघांनाही तिथे एक आठवडा राहावे लागले. मात्र या कॅप्सूलमधील तांत्रिक समस्येमुळे दोघेही जवळपास 9 महिन्यांपासून तिथे अडकले आहेत. आता त्यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे अंतराळयान रविवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले. आता विल्यम्स आणि विल्मोर हे पृथ्वीवर परतणार आहेत.


विल्यम्स यांचा परतीचा प्रवास लाईव्ह पाहता येणार…
नासाने दिलेल्ल्या माहितीनुसार 18 मार्च रोजी दुपारी 5.57 वाजता ( भारतात 19 मार्च रोजी पहाटे 3.27 वाजता) अंतराळवीर फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात उतरणार आहेत. स्पेसएक्स क्रू-9 मोहिमेच्या परतीचे लाईव्ह कव्हरेज देखील नासा द्वारे दाखवले जाणार आहे. हे कव्हरेज नासाच्या युट्यूब चॅनेलवर सोमवार, 17 मार्च रोजी रात्री 10.45 वाजता ( भारतात 18 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता) सुरू होईल.