मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रा. माधव राजगुरू यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन
“मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध असतो” — प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
सातारा (प्रतिनिधी) : “मातृभाषेतून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध असतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांच्या वतीने प्रा. माधव राजगुरू लिखित ‘मराठी भाषेपुढील आव्हाने – एक चिंतन’, ‘धमाल बालगीते’ आणि ‘जगातील सर्वात सुंदर पत्रे’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि विज्ञानकथा व बालकथा कादंबरीकार डॉ. संजय ढोले यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी म.सा.प. पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, व्यवस्थापक विनायक भोसले तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे. माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने लाभतात. मात्र संगणक युगात इंग्रजी भाषेचे वर्चस्व वाढल्याने मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वास्तवाचा सखोल अभ्यास करून प्रा. माधव राजगुरू यांनी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे,” असे ते म्हणाले.
विनोद कुलकर्णी यांनी सांगितले, “प्रा. माधव राजगुरू यांना मराठी भाषेच्या चिंतनाचा विशेष आवड आहे. थोरले शाहू महाराजांनी मराठी भाषेचा विस्तार घडवून आणला. अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठी अधिक उत्सवप्रिय व लोकाभिमुख झाली आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. संजय ढोले म्हणाले, “साताऱ्यात होणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांना नवचिंतनाचा संदेश देईल. मराठी भाषेच्या प्रगतीसाठी तळमळीने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. माधव राजगुरू. तंत्रज्ञान, विज्ञान आणि साहित्य हे एकमेकांचे पूरक घटक असून येणाऱ्या काळात मराठी भाषेतील बदल अधिक प्रभावी असतील. ‘जगातील सर्वात सुंदर पत्रे’ हे पुस्तक प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला वाचून दाखवावे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डी. एम. पाटील आणि रमेश महामुलकर यांनी तबला-पेटीच्या तालावर प्रा. माधव राजगुरू यांच्या ‘जीवनशाळा’ या कवितेचे मनमोहक सादरीकरण केले.
या प्रसंगी मोहन सुखटनकर, गौतम भोसले, सीमंतिनी नुलकर, श्रीराम नानल, डॉ. संदीप श्रोत्री, आनंदा ननावरे, अनिल सुर्वे, बाळकृष्ण इंगळे, यश शीलवंत, हणमंत खुडे, शेग्या गावीत, जगदीश खंडागळे, विजय गव्हाळे, दत्तात्रय शिर्के आणि रवींद्र कळसकर उपस्थित होते.

Back to top button
×
No WhatsApp Number Found!