Akkalkot: दत्तजयंती निमित्त पुणे येथील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाकडून स्वामींना ५५१ किलो सुकामेव्याचे नैवेद्य

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री दत्त जयंती निमीत्त पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने आज काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, जरदाळू, पिस्ता, खारीक इत्यादी ५५१ किलो सुकामेव्याचा नैवेद्य काकड आरतीच्या वेळी स्वामी चरणी अर्पण करण्यात आला. आज गुरुवार रोजी पहाटे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळे, अजय कोडमूर, सुधीर माळशेट्टी व सेवासार संघाचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा सुकामेव्याचा नैवेद्य पहाटे काकड आरती प्रसंगी स्वामींना दाखविण्यात आला. काकड आरतीनंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळें यांच्या मार्गदर्शनानुसार आरती नंतर हा सुकामेव्याचा नैवेद्य (अन्नकोट) उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आला.

या प्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री दत्तात्रय महाराज असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा हा नेहमीच मोठ्या भक्ती भावाने व उत्साहाने साजरा होत असतो. भाविकही या सोहळ्यामध्ये मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. या पाश्वभुमीवर आज पुणे येथील स्वामी समर्थ सेवासार संघाचे सदस्य या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धेपोटी भाविकांच्या सहकार्याने आज त्यांनी सुका मेव्याचा हा अन्नकोट त्यांनी समर्थांच्या चरणी अर्पण केलं आहे अशी माहिती चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. यावेळी प्रथमेश इंगळे, श्री वटवृक्ष महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, स्वामी समर्थ सेवासार संघाचे सदस्य, स्वामीभक्त तम्मा भिमपूरे, सुधीर माळशेट्टी, संजय पवार, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
