पुस्तक क्रमांक : 99
*पुस्तकाचे नाव* – निसर्ग दाता
*लेखक* – विठ्ठल वळसे पाटील
*प्रकाशक* – मातृरक्षा प्रकाशन, पुणे.
*पृष्ठे* – 160
*मूल्य* – 200 रु.
*मुखपृष्ठ -* – विठ्ठल वळसे पाटील
*आवृत्ती -* 14 डिसेंबर 2025
*समीक्षक -* सचिन बेंडभर.
________________________________
*सामाजिक भान जपणारी पर्यावरण विषयक वैचारिक क्रांती*
लेखक विठ्ठल वळसे पाटील हे जनशक्ती आणि जनप्रवास या वृत्तपत्राचे पत्रकार आहेत. तसेच निरगुडसर गावचे ते पोलीस पाटील आहे. दर आठवड्याला संपादकीय पानावर त्यांचे स्तंभलेखन प्रकाशित होत असते. असंघटित कामगार, पाणी प्रश्न, प्रदूषण, देशी वृक्ष लागवड, रस्ता सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा यांसारखे अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी आपल्या लेखातून मांडून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसंगी व्यवस्थेच्या विरोधातही त्यांची लेखणी अत्यंत धारदार चालते. सामाजिक जीवनात वावरत असताना त्यात निर्माण होणारे प्रश्न, अडचणी आणि समस्यांवर वळसे पाटलांनी आपल्या लेखणीच्या रूपाने आवाज उठवला आहे. प्रसंगी व्यवस्थेच्या विरोधात लिहिताना ते डगमगले नाहीत, उलट त्यांची लेखणी अधिक धारदार झाली. मुळातच पाटील असल्यामुळे पहिल्यापासूनच त्यांनी आपला सडेतोड बाणा जपला आहे. जसे बोलणे तसेच वागणे आणि तशीच कृती असल्यामुळे परिसरात त्यांच्या नावाचा विशेष दबदबा आहे. पोलीस पाटील असल्यामुळे गावकीचा कारभारही ते अतिशय उत्तमरीत्या सांभाळतात.
निसर्ग दाता हे पर्यावरण विषयक वैचारिक लेखांचे सुंदर पुस्तक असून यात एकूण 44 लेखांचा समावेश आहे. सर्व लेख पर्यावरण विषयक दृष्टिकोन समोर ठेवून लिहिले गेले आहेत. कळते पण वळत नाही या उक्तीप्रमाणे माणूस पर्यावरणाचे हानीच करत चाललाय. त्यामुळे दैनंदिन जीवनात त्याचा त्रास मानवाला होत आहे. मग कोरोनाचा प्रादुर्भाव असो की बिबट्याचे हल्ले याला केवळ एकमेव कारण म्हणजे माणसाने केलेला पर्यावरणाचा ऱ्हास होय. ही खंत मनात ठेवून लेखकाने सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून पर्यावरण विषयक जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्तंभलेखक म्हणून ओळख असणाऱ्या वळसे पाटलांनी वृत्तपत्रातून आपल्या लेखातून पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण केली आहे. त्यांनी जमीन, अवकाश, जल आणि वन्यजीव यांचा अभ्यास करून त्याचा आढावा आपल्या लेखांतून घेतला आहे. पर्यावरण टिकले तर माणूस टिकेल, ही जाणीव मनात ठेवून त्यांनी प्रामाणिकपणे वसुंधरेची सेवा केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहेच परंतु विशेषतः देशी वृक्षांच्या लागवडीसाठी लेखकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. केवळ लेखन पुरते नाही किंवा अभ्यासा पुरते मर्यादित न ठेवता रोजच्या जीवनात निसर्ग व पर्यावरण हा विषय लेखकाने आत्मसात केला आहे. म्हणूनच की काय दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त ते देशी वृक्षांची लागवड करत असतात. एवढेच नव्हे तर आपल्या निसर्ग दाता या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशीही त्यांनी वृक्ष लागवड करून पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
वळसे पाटलांनी आपल्या लेखात वृक्षांचे महत्त्व तर सांगितले आहे. शिवाय सध्याच्या काळात प्रदूषण कोणत्या प्रकारे होत आहे व त्याची मनुष्याला किती हानी होत आहे त्याचे दुष्परिणाम त्यांनी आपल्या लेखात मांडले आहे. एवढेच नव्हे तर वेद पुरानांपासून वृक्षांचे महत्त्व त्यांनी आपल्या लेखातून पटवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे दाखले देत वृक्षाचे धार्मिक ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व वाचकांना सांगितले आहे. शहरी भागात आज प्रदूषणाची गंभीर समस्या आहे मग ते जलप्रदूषण असो की हवा प्रदूषण. हवेचे प्रदूषण तर भीषण आहे शहरी भागात हवा दुसर होत चालली आहे.हवा खेळती राहणे का गरजेचे आहे त्याचे महत्त्व त्यांनी आपल्या लेखातून मांडले आहे. ते मांडत असताना ते पोथ्या पुरानातील ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांचे दाखले तर देतात शिवाय वृक्षांचे वैज्ञानिक महत्त्वही ते वाचकांना पटवून देतात.
याशिवाय महापुरुषांच्या जीवनातील असणारे वृक्षांचे महत्त्व त्यांनी विशद करत ऋषीमुनींचे तप, मनःशांती, साधना , एकाग्रता आणि स्थैर्य या गोष्टी वृक्षांखाली कशाप्रकारे झाल्या त्याचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये नदीला तर तीर्थच मानले आहे. नद्यांची महत्त्व विशद करत सप्त नद्यांची माहिती ही लेखकाने वाचकांना सुंदररित्या दिली आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगून लेखकाने प्रत्येक नागरिकाला आपल्या कर्तव्यप्रती दक्ष राहायला सांगितले आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथातून निसर्गाचे दर्शन व वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टी लेखकाने वाचकांसाठी आवर्जून मांडलेल्या आहेत. तसेच संत नामदेव, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, समर्थ रामदास या थोर महापुरुषांच्या दृष्टिकोनातून असणारे निसर्गाची महत्त्व लेखकाने आपल्या लेखन शैलीतून विशद केले आहे.
पुणे येथील मातृरक्षा प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. वळसे पाटलांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. वनसंरक्षक भा.व.से. आशिष ठाकरे यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. युक्रांदचे संघटक विकास लवांडे यांनी या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर मुंबई येथील मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व दैनिक सकाळचे वरिष्ठ पत्रकार शरद पाबळे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. सामाजिक भान जपणारे लेखक विठ्ठल वळसे पाटील यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
————————————
*सचिन बेंडभर*
महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!