गावगाथा

राजेश कृष्णन यांच्या ‘संगीत संजे’ने अक्कलकोटकर मंत्रमुग्ध

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवातील दुसरे पुष्प उत्साहात संपन्न

राजेश कृष्णन यांच्या ‘संगीत संजे’ने अक्कलकोटकर मंत्रमुग्ध
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवातील दुसरे पुष्प उत्साहात संपन्न
अक्कलकोट (प्रतिनिधी) :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मालिकेतील दुसरे पुष्प म्हणून कर्नाटकचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक राजेश कृष्णन यांच्या ‘संगीत संजे’ या बहारदार कन्नड संगीत मैफिलीने रसिक श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. लोकप्रिय कन्नड भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आसनव्यवस्था अपुरी पडल्याने अनेकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महोत्सवानिमित्त सोमवार, दि. २० जुलै रोजी सायंकाळी ७.१५ वाजता हा कार्यक्रम रंगला. राजेश कृष्णन यांच्यासमवेत प्रसिद्ध निवेदिका प्रतिभा, गायक साक्षी, नदीर बानू, हर्षवर्धन व बेंगळुरू येथील सहकलाकारांनी सुरेल सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन म. नि. प्र. अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजी (विरक्त मठ, नागणसूर), अंजलीताई बाजारमठ, सुरेश नागूर, ऋतुराज (बंटी) राठोड, रश्मीताई सागर हिप्परगी, सागर कल्याणशेट्टी, डॉ. विवेक करपे, सिद्धाराम पाटील, डॉ. अक्षय हणमशेट्टी, डॉ. बसवराज पाटील, विकास बुळ्ळा, मल्लिकार्जुन आळगी, सपना मोरे, रोहिणी निंबाळ, शिवम्मा बमनळ्ळी आणि अप्पू पराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, नटराज आणि भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजेश कृष्णन व त्यांच्या संपूर्ण कलावंतांच्या चमूचाही न्यासाच्या वतीने सन्मान करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्रोच्चारात पूजन विधी पार पडला.

कार्यक्रमात तालुक्यातील तोळणूर येथील अंध गायक रेवणसिद्ध फुलारी यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थितांची दाद मिळवली. तसेच इम्पॅक्ट मोशन, सोलापूर या कलासंस्थेच्या कलाकारांनी अस्सल सोलापुरी भाषेतील विनोदी सादरीकरण करून रंगत वाढवली. या कलाकारांचाही न्यासाच्या वतीने गौरव करण्यात आला.
चौकट : गुणीजन गौरव
मल्लप्पा बंडेप्पा जीगजंबगी, पत्रकार सचिन म्हेत्रे (चपळगाव), नितीन शिंदे आणि शिक्षक लक्ष्मण म्हेत्रे (सातनदुधनी) यांना न्यासाच्या वतीने ‘गुणीजन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट : गुणवंत विद्यार्थी गौरव
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सात गुणवंत विद्यार्थ्यांचा न्यासाच्या वतीने गौरव करण्यात आला.
चौकट : आजचे आकर्षण
मंगळवार, दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ ते ९.३० या वेळेत ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त, पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, भक्तगण व हजारो रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. कार्यक्रमासाठी शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी आकर्षक प्रकाशयोजनेची व्यवस्था केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button