शिवरायांच्या विचारांची आजच्या युगाला नितांत गरज – प्रा. नितीन बानगुडे-पाटील
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट, दि. २१ (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी मानवी मूल्ये, चारित्र्य आणि स्त्रीसन्मान यांचे जतन करत आदर्श स्वराज्य उभे केले. त्यांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जात होती. शिवरायांचे वैयक्तिक आयुष्य निष्कलंक होते आणि त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प म्हणून मंगळवारी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर त्यांनी प्रभावी व्याख्यान दिले. हा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, नटराज व भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजनही यावेळी करण्यात आले. प्रारंभी डेव्हीन ग्रुप, मुंबई यांनी शिवरायांवरील नृत्याविष्कार सादर करून वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी केले.
व्याख्यानात प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी राजा नव्हते, तर दूरदृष्टीचे राष्ट्रनिर्माते होते. स्वराज्य, न्याय, स्त्रीसन्मान, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणकारी प्रशासन यांचा आदर्श त्यांनी घालून दिला. आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार आणि मूल्ये आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने श्री स्वामी समर्थांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची रेखीव प्रतिमा आणि कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी व विश्वंभर पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पूजन संपन्न झाले. सिद्धाराम माळी, अप्पू कलशेट्टी तसेच अविनाश मडीखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला.
महोत्सवानिमित्त गुणीजन गौरव पुरस्कार देऊन एम. बी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी स्वागत व आभार मानले. कार्यक्रमास न्यासाचे पदाधिकारी, विश्वस्त, सेवेकरी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : सार्थ अभिमान
“श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ गेल्या २७ वर्षांपासून धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेचा सार्थ अभिमान वाटतो,” असे गौरवोद्गार प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी काढले.
चौकट : आजचा कार्यक्रम
बुधवार, दि. २२ जुलै रोजी सायंकाळी ७.१५ ते ९.३० या वेळेत लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर व सहकलाकार (मुंबई) यांचा ‘स्वर आर्या’ हा मराठी भावगीत व भक्तिगीतांचा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
चौकट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभ संदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ व्या वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी व सर्व भाविकांना शुभेच्छा देत हा उत्सव समाजात श्रद्धा, संस्कार, सद्भावना आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणारा असल्याचे नमूद केले. तसेच या महोत्सवातील धर्मसंकीर्तन, व्याख्याने, संगीत, कीर्तन, नाट्यप्रयोग आणि गुणवंतांचा गौरव हे समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम असल्याचे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!