गावगाथा

कोन्हाळी गावचा अभिमान : युवा चित्रकार सचिन घंटे यांची राज्यस्तरावर घवघवीत यशस्वी झेप – महाराष्ट्र प्रथम क्रमांक पटकावला

गावगाथा विशेष

गावगाथा विशेष ….
कोन्हाळी गावचा अभिमान : युवा चित्रकार सचिन घंटे यांची राज्यस्तरावर घवघवीत यशस्वी झेप – महाराष्ट्र प्रथम क्रमांक पटकावला
अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावचे सुपुत्र, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले युवा चित्रकार सचिन घंटे यांनी आपल्या अफाट कलागुणांच्या, जिद्द-चिकाटीच्या व कठोर परिश्रमांच्या जोरावर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावत तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे, तसेच मेरा युवा भारत / राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर युवा महोत्सव २०२५-२६ अंतर्गत झालेल्या चित्रकला स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करत सचिन घंटे यांनी उत्कृष्ट कलासादरीकरण करत हे मानाचे यश मिळवले.
ग्रामीण पार्श्वभूमी असूनही कला क्षेत्रात सातत्याने मेहनत घेत, मर्यादित साधनांमध्येही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सचिन घंटे यांच्या या यशाने कोन्हाळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळाली असून “ग्रामीण भागातूनही राज्य व देशपातळीवर यश मिळवता येते” हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
या राज्यस्तरीय यशानंतर आता ८ ते १२ जानेवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात सचिन घंटे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत. विशेष म्हणजे या राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरणावेळी माननीय पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या समवेत त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे, ही बाब अक्कलकोट तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरणारी आहे.
सचिन घंटे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, गावकरी, मित्रपरिवार, शिक्षक, मार्गदर्शक व कुटुंबीयांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोन्हाळी गावच्या मातीतील हा कलाकार आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची ओळख निर्माण करणार असून, त्यांच्या यशाने “गावगाथा”त सुवर्णाक्षरांनी नाव कोरले गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button