कन्नड शिक्षक तथा साहित्यप्रेमी शिवानंद गोगाव यांनी ‘संत तुकारामांचे अभंग शतक’चा कन्नड अनुवाद भाषांतर करून उभारला मराठी-कन्नड साहित्याचा सेतू उभारला
ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे लिखित ‘संत तुकारामांचे अभंग शतक’ या गाजलेल्या मराठी ग्रंथाचा कन्नड भाषेत ‘संत तुकारामर अभंग शतक’ या नावाने अनुवाद

HTML img Tag
अक्कलकोट : प्रतिनिधी….
मराठी संत साहित्याचा अमूल्य ठेवा कन्नड भाषिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वागदरी (ता. अक्कलकोट) येथील कन्नड शिक्षक तथा साहित्यप्रेमी शिवानंद गोगाव यांनी केले आहे. ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे लिखित ‘संत तुकारामांचे अभंग शतक’ या गाजलेल्या मराठी ग्रंथाचा कन्नड भाषेत ‘संत तुकारामर अभंग शतक’ या नावाने अनुवाद करून त्यांनी मराठी-कन्नड साहित्याचा सेतू उभारला आहे.
लोकायत प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या या ग्रंथात संत तुकाराम महाराजांच्या निवडक शंभर अभंगांचे सोप्या व सुबोध भाषेत विवेचन करण्यात आले आहे. अभंगांमधून आई-वडील, संसार, सहवास, श्रम, शेती, क्षमा, शांतता, भक्ती आणि सामाजिक मूल्यांचा संदेश दिला असून तो कन्नड वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य गोगाव यांनी केले आहे.
मूळचे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील असलेले शिवानंद गोगाव यांचा जन्म, शिक्षण आणि कार्याचा मोठा कालावधी अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथेच व्यतीत झाला. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कन्नड भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.
ग्रंथाच्या मलपृष्ठावर प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धवळे यांनी गोगाव यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. विद्यार्थी जीवनापासूनच साहित्याची आवड जोपासणाऱ्या गोगाव यांनी शरण साहित्य, संत साहित्य आणि भाषिक ऐक्य यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील कन्नड साहित्यिक चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
अनुवाद साहित्य क्षेत्रात सक्षम अनुवादकांची गरज असताना मराठीतील श्रेष्ठ साहित्य कन्नड भाषेत आणण्याचे शिवानंद गोगाव यांचे कार्य अत्यंत मोलाचे असून, यामुळे मराठी व कन्नड या दोन भाषांतील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची भावना साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
या ग्रंथाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे विचार कन्नड भाषिक वाचकांपर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचणार असून मराठी-कन्नड साहित्य देवाणघेवाणीला नवी दिशा मिळणार आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!