गोंगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्याचे वाटप; महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम..
गोगाव : श्री महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, गोगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जि. प. प्रा. मराठी शाळा, गोगाव येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, गोगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नडगेरी साहेब उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष महादेव आलुरे, शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर, कारभारी सर, भोसले मॅडम तसेच विनोद आलुरे, सुरेश पाटील, धनराज बिराजदार, किरण अण्णा वाडे, अनिल गुंजोटी, विठ्ठल गुरव, राहुल मुळजे, बसवराज पाटील, अजित मुलगे, सुमित पाटील, श्रीशैल पट्टेदार, करण गुरव व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, लेखन साहित्य तसेच विविध क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रगती करण्याचे आवाहन केले. तसेच कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आवड वाढण्यास मदत होणार असून क्रीडा क्षेत्रातही त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, गोगाव यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!