गावगाथा

सरपंच वनिता सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ सोशल फौंडेशनचा सामाजिक उपक्रम

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

सरपंच वनिता सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ सोशल फौंडेशनचा सामाजिक उपक्रम

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

अक्कलकोट : प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी जपत आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गोगांवच्या लोकप्रिय सरपंच सौ. वनिता मधुकर सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ सोशल फौंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोगांव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप हे होते. यावेळी केंद्रप्रमुख अशोक पोमाजी, मुख्याध्यापक पुंडलिक वाघमारे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत जिरगे, कल्याणराव बिराजदार, यमाजी सर, शाम बाबर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरणबसप्पा मुळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना उपसरपंच तथा सिद्धार्थ सोशल फौंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे म्हणाले, “समाजातील वंचित, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सरपंच वनिता सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
ते पुढे म्हणाले की, सौ. वनिता सुरवसे यांनी आपल्या कार्यकर्तृत्व, दूरदृष्टी आणि लोकाभिमुख नेतृत्वाच्या जोरावर गोगांवच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. त्यांनी गावातील पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा तसेच विविध सामाजिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
गावातील सिमेंट काँक्रिट रस्ते, बंदिस्त गटारे, पेव्हर ब्लॉक, सभामंडप, सांस्कृतिक भवन, जलजीवन मिशन, ग्रामपंचायत इमारत तसेच श्री कल्लेश्वर मंदिर विकास यांसारख्या अनेक विकासकामांमधून त्यांच्या कार्याची छाप स्पष्टपणे दिसून येते. सामाजिक समता आणि लोककल्याणासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.
राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वनिता सुरवसे यांनी प्रशासनातही प्रभावी नेतृत्व करत महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोगांव विकासाच्या नव्या उंचीवर झेपावत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भोसले मॅडम , सुधीर जगताप, विजयकुमार गायकवाड. सचिन गायकवाड, सागर वामने. यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महादेव सोनकवडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button