गावगाथा

अन्वयी फाउंडेशनकडून आषाढी वारीत हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद; सलग अकराव्या वर्षी निःस्वार्थ सेवायज्ञ

सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य

अन्वयी फाउंडेशनकडून आषाढी वारीत हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद; सलग अकराव्या वर्षी निःस्वार्थ सेवायज्ञ

पुणे, प्रतिनिधी :
आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त अन्वयी फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने यंदाही पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाप्रसाद वितरणाचा सेवा उपक्रम भक्तिभावाने पार पडला. संस्थापक-अध्यक्ष ॲड. प्रा. सदाशिव माळगे व त्यांच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी किंवा जाहिरातीची अपेक्षा न ठेवता सलग अकराव्या वर्षी हा सेवायज्ञ अविरत सुरू ठेवला आहे.


अन्वयी फाउंडेशनची स्थापना जिच्या नावाने करण्यात आली त्या चिमुकली अन्वयीच्या शुभहस्ते या सेवा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. हजारो वारकऱ्यांना प्रेमाने, आपुलकीने आणि विठ्ठलभक्तीच्या भावनेतून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त करत फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.


या सेवायज्ञात ॲड. प्रा. सदाशिव माळगे यांचे संपूर्ण कुटुंब तसेच अन्वयी फाउंडेशनचे सेवाभावी कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि हितचिंतक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिस्तबद्ध नियोजन, सेवाभाव आणि वारकऱ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.
“वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या पवित्र भावनेतून सुरू असलेला हा उपक्रम समाजसेवा, भक्ती, संस्कार आणि मानवतेचा सुंदर संगम असल्याचे ॲड. प्रा. सदाशिव माळगे यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाने अशा सेवाकार्यात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी या सेवाकार्यात मोलाचे योगदान देणारे सर्व सेवाभावी कार्यकर्ते, सहकारी, हितचिंतक, दानशूर व्यक्ती तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अन्वयी फाउंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ॥
॥ श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम ॥ 🙏🚩

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button