गावगाथा

ग्रामदैवत श्री परमेश्वराला पावसासाठी साकडे; वागदरीत शेतकरी व ग्रामस्थांची सामूहिक प्रार्थना

वरुणराजाला प्रार्थना

ग्रामदैवत श्री परमेश्वराला पावसासाठी साकडे; वागदरीत शेतकरी व ग्रामस्थांची सामूहिक प्रार्थना
वागदरी (ता. अक्कलकोट) : अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान येथे पावसाने दडी मारल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी वरुणराजा प्रसन्न व्हावा यासाठी सामूहिक प्रार्थना करत श्री परमेश्वर महाराजांना अभिषेक अर्पण केला.
यंदा पावसाचे आगमन समाधानकारक झाले नसल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीनंतर उगवलेल्या पिकांना जीवनदान देणाऱ्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील सर्व शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या श्रद्धाभावाने श्री परमेश्वर देवस्थानात एकत्र आले.
यावेळी ग्रामदैवताला जलाभिषेक करण्यात आला. “श्री परमेश्वर महाराज की जय… श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय…” अशा जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. उपस्थित भाविकांनी हात जोडून परमेश्वराकडे साकडे घालत, “हे देवा, दयाळा परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर. आकाशातून अमृतासारखा पाऊस बरसव. शेतकरी आशेने तुझ्याकडे पाहत आहे. मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय होण्यासाठीही तुझी कृपा आवश्यक आहे,” अशी आर्त प्रार्थना केली.
ग्रामीण भागात निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही कायम असल्याचे या सामूहिक प्रार्थनेतून दिसून आले. संकटाच्या काळात श्रद्धा, एकोप्याची भावना आणि ग्रामदैवतावरील विश्वास यामुळे गावकरी एकत्र येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आता सर्व शेतकरी व ग्रामस्थांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या असून, लवकरच मुसळधार पाऊस होऊन शेतशिवार हिरवेगार व्हावेत आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, अशीच सर्वांची प्रार्थना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button