गावगाथा

जेऊर जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा वाढता प्रभाव; भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

राजकीय घडामोडी

जेऊर जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा वाढता प्रभाव; भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

अक्कलकोट | प्रतिनिधी
अक्कलकोट येथे नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जेऊर जिल्हा परिषद गटातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पक्षप्रवेशामुळे या परिसरात शिवसेनेचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यामध्ये भाजपचे पदाधिकारी म्हणून ओळख असलेले मुकेश कांबळे यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर आणखी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
मुकेश कांबळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे सांगितले जाते. तसेच, २०२९ पर्यंत भारतीय जनता पक्षातील ५० टक्के कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मुकेश कांबळे हे यापूर्वी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. जेऊर जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असताना, पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता, शिवसिद्ध बुळ्ळा यांचे चिरंजीव विकास बुळ्ळा यांना उमेदवारी देण्यात आल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर मुकेश कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे.
या पक्षप्रवेशामुळे जेऊर जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button