गोगावच्या रस्त्यांसाठी ₹१ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर; सरपंच सौ. वनिता सुरवसे यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे मानले मनःपूर्वक आभार
अक्कलकोट | प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील गोगाव ग्रामपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत गावातील दोन प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ₹१ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजूर होण्यासाठी गोगावच्या सरपंच सौ. वनिता मधुकर सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडे वारंवार मागणी लावून धरली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंजूर निधीनुसार चौदा मैल ते अंबाबाई मंदिर रस्त्यासाठी ₹८० लाख, तर गोगाव ते पडसलगी रस्त्यासाठी ₹२५ लाख असा एकूण ₹१ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या कामांमुळे गावातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सरपंच सौ. वनिता मधुकर सुरवसे यांनी सांगितले की, “गोगावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. गावातील प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा केला. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत सकारात्मक भूमिका बजावली आणि विकासाभिमुख निर्णय घेत हा महत्त्वपूर्ण निधी मंजूर करून दिला. याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”
यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी सांगितले की, “गावातील रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. ग्रामस्थांच्या मागणीनुसार सरपंच सौ. वनिता सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर करून दिला. या निधीमुळे गोगावच्या विकासाला निश्चितच नवी गती मिळेल आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होतील.”
गोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या विकासासाठी भविष्यातही विविध पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मंजूर निधीमुळे दोन्ही रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी गोगाव ग्रामपंचायत, सरपंच सौ. वनिता मधुकर सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या निधीमुळे गोगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून ग्रामस्थांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!