Pune : संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याचे प्रणेते आ हर्षवर्धन सपकाळ व महंत ह भ प पुरुषोत्तमदादा पाटील यांना संत चोखामेळा समता पुरस्कार जाहीर

पुणे (प्रतिनिधी): वारकरी संप्रदायातील समता, बंधुता व मानवता या मूल्यांना केंद्रस्थानी मानून कार्यरत बंधू-भगिनींना संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा २०२४ यावर्षांसाठीचा संत चोखामेळा समता पुरस्कार संत चोखामेळा महाराज जन्मभूमी मेहुणाराजा जि बुलढाणा येथील संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याचे प्रणेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ( बुलढाणा ) व संत विचारांचा जागर आधुनिक माध्यमाद्वारे अधिक समर्थपणे करणारे लोकप्रिय कीर्तनकार प्रवचनकार महंत ह भ प पुरुषोत्तमदादा पाटील (आळंदी ) यांना जाहीर करण्यात आला आहे.

संत चोखामेळा समता पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दि. १३ जून 202४ रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश सभागृह , न्यू इंग्लिश स्कूल , टिळक रोड , पुणे येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण सकल संत चरित्र कथा निरूपणकार , संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह भ प दीपकजी महाराज श्री क्षेत्र तेर
यांच्या शुभहस्ते होणार असून सावित्रीबाई फुले , पुणे विद्यापीठ पुणे च्या संत ज्ञानदेव , संत नामदेव व संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक प्रो .डॉ. ओम श्रीश श्रीदत्तोपासक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत माजी खासदार डॉ. सुनीलराव गायकवाड , किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष , शेतकरी , कष्टकरी , कामगार नेते डॉ. रघुनाथराव कुचिक , रिपाइं नेते महादेवराव कांबळे , मुंबई डबेवाला प्रमुख उल्हासभाऊ मुके , संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा प्राचार्या उल्काताई चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली.

आ.हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना त्यांच्याच संकल्पनेतुन संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याची बुलढाणा जिल्हा परिषद यांच्या वतीने मेहुणाराजा येथे सुरुवात झाली , यास यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. सपकाळ यांनी आत्यंतिक श्रद्धेने सुरु केलेला जन्मोत्सव सोहळा आज मोठया प्रमाणात साजरा होतो. प्रतीवर्षी राज्यातील चोखामेळा भक्त , अभ्यासक संशोधक या सोहळ्यास हजेरी लावतात , संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळा सोबतच संत चोखामेळा महाराज व कुटूंबातील अन्य संतांच्या विचार संवर्धन उत्कर्ष कार्यात सपकाळ सक्रिय असतात त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना संत चोखामेळा समता पुरस्कार सार्वजनिक गटातून जाहीर करण्यात आला . सोबतच वारकरी संप्रदायातील लोकप्रिय कीर्तनकार प्रवचनकार ह भ प श्री महंत पुरुषोत्तम दादा पाटील आळंदीकर हे आळंदी येथील
श्री सद्गुरु अमृता स्वामी मठाचे मठाधिपती आहेत .
तसेच झी टॉकीज वरील कीर्तन मालिका गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा व मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार आहेत . ह भ प पुरुषोत्तमदादा पाटील हे आधुनिक माध्यमाद्वारे वारकरी विचारांचा सातत्याने प्रचार प्रसार करत असतात , तरुण पिढीस समजेल अशा साध्या सोप्या भाषेतील मांडणीद्वारे ते संत विचार घेउन प्रबोधन करत आहेत . आध्यात्मिक गटातून त्यांना संत चोखामेळा समता पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
चंद्रभागेच्या तिरी श्री विठ्ठलाच्या अस्तित्वाला केंद्र मानून अठरापगड जातींना एकत्र करणारा ‘महासमन्वय’ म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याची मुळे बहुजनांच्या आध्यात्मिक हिताच्या मानवीय व्यवहारात गुंतलेली आहेत. समाजात बंधुभाव अन् सामाजिक एकता प्रस्थापित करावयाची असेल तर, वारकरी संप्रदाय हेच एकमेव अधिष्ठान आहे. एकसंध समाज हे राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे. जात, पंथ, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय एक आहोत. हा विचार घेऊ सामाजिक एकतेसाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजासमोर घेऊन जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ‘संत चोखामेळा समता पुरस्कार’ होय.
वारकरी संतांनी सांगितलेल्या मार्गाने जनसेवेच्या कार्यात प्रामाणिकपणे गढून गेलेल्या व्यक्तीमत्वाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांनी केले.
