विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे … सिद्धाराम मसुती
कल्याणशेट्टी महाविद्यालयात राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त उद्योजकता कार्यशाळा..

विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे …
सिद्धाराम मसुती

कल्याणशेट्टी महाविद्यालयात राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त उद्योजकता कार्यशाळा..

अक्कलकोट
महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी ज्ञानसंपन्न होतो, त्यानंतर नोकरी रोजगाराची संधी प्राप्त होत नाही म्हणून निराश होतो अशा स्थितीत जीवन सुखकारक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक सिद्धाराम मसुती यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व रा से यो विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या उद्योजकता कार्यशाळेचा शुभारंभ करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी मलकप्पा भरमशेट्टी होते. व्यासपीठावर डॉ बाळासाहेब पाटील, प्रा राजशेखर पवार, प्राध्यापिका हर्षदा गायकवाड उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, रोजगाराच्या संधी पेक्षा उद्योजक म्हणून समाजात नावलौकिक प्राप्त होतो. उद्योगासाठी बँकेकडून मुबलक कर्ज मिळते, अत्यंत कष्ट व मेहनत घेऊन उद्योग व्यवसाय केल्यास व्याजासहित कर्ज फेडणे शक्य होते. आपला चरितार्थ देखील चांगल्या पद्धतीने चालतो.

मलकप्पा भरमशेट्टी म्हणाले की सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. उद्योजकता हा त्यावर एकमेव उपाय आहे. विद्यार्थ्यांनी लघु उद्योगातून पदार्पण करून त्याचे मोठ्या उद्योगात रूपांतर करावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा राजशेखर पवार यांनी केले सूत्रसंचलन प्रा. हर्षदा गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. गणाचारी यांनी मानले कार्यशाळेस प्रा मनीषा शिंदे, प्रा विद्या बिराजदार, प्रा विद्याश्री वाले यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उद्योजक सिद्धाराम मसुती, मलकप्पा भरमशेट्टी व मान्यवर