HTML img Tag
डॉ. तुकाराम रोंगटे ह्यांच्या साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न
प्रतिनिधी, पुणे, : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. तुकाराम रोंगटे ह्यांच्या साहित्यावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र २१ फेब्रुवारी रोजी चिंचवडगाव याठिकाणी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तसेच विद्यापीठ गीताने करण्यात आली. त्यानंतर उद्घाटनाचे अध्यक्ष तसेच इतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चर्चासत्राचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. संभाजी मलघे यांनी संपादित केलेल्या ‘तुकाराम रोंगटे यांचे साहित्य’ तसेच विशाल साळवे यांच्या ‘अधिकारी माणूस : एक आकलन’ या समीक्षाग्रंथाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शिरीष लांडगे पाटील, प्राचार्य पांडुरंग भोसले, प्रा. प्रदीप पाटील, महेंद्रजी भारती, डॉ. तुकाराम रोंगटे, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. या उपस्थित मान्यवर पाहुण्याचा सन्मान डॉ. तुकाराम रोंगटे यांनी केला.
राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून डॉ. शिरीष लांडगे पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या साहित्यावर बोलताना डॉ. लांडगे यांनी विचार व्यक्त केले. ‘डॉ. तुकाराम रोंगटे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून यांनी क्रीडाक्षेत्रात राष्ट्रपती पदाचे मानकरी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी १९९० च्या दशकात लेखनकार्याची सुरुवात करत एकूण १२ ग्रंथाची निर्मिती करून आदिवासी साहित्य अधिक समृद्ध केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासी समाजासाठी असलेल्या उल्लेखनीय योगदानाची चर्चा ‘आदिवासींचेही बाबासाहेब’ या ग्रंथात केली आहे’ असे प्रतिपादन डॉ. शिरीष लांडगे पाटील यांनी आपल्या बीजभाषणात केले. पुढे ते म्हणाले की, ‘डॉ. तुकाराम रोंगटे यांचा साहित्यगोंदण हा ग्रंथ १९८४ ते १९९० या कालखंडातील आदिवासी साहित्य आणि समीक्षेचा प्रवाह समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे’, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. तुकाराम रोंगटे यांचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्य यासंदर्भात चर्चा केली. ते यावेळी म्हणाले की, ‘डॉ. तुकाराम रोंगटे यांचे आदिवासी साहित्यक्षेत्रातील स्थान हे उल्लेखनीय अशा स्वरूपाचे आहे. त्यांनी डॉ. गोविंद गारे, डॉ. विनायक तुमराम, यांसारख्या विचारवंतांच्या बरोबरीने आपले स्थान निर्माण केले आहे. कारण त्यांनी संविधानिक संदर्भाने ‘आदिवासींचेही बाबासाहेब’ या ग्रंथाचे लेखन करून आदिवासी वैचारिक लेखनात आपला ठसा उमटवला आहे’, असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी डॉ. रोंगटे यांच्या जडणघडणीत त्यांच्या गुरूंचे असणारे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आदिवासी समाजाची प्रगती झाल्याशिवाय या देशाची परिपूर्ण प्रगती होऊ शकणार नसल्याचे मत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी अत्यंत दुर्लक्षित समूहातून येऊन शिक्षणाच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. तुकाराम रोंगटे यांचे क्रीडाक्षेत्रातील मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव दिघे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. दिघे यांनी आपल्या शिष्याचा सन्मान करून आनंद व्यक्त केला.
प्रा. प्रदीप पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘संविधानाने आदिवासी आणि दलितांना बळ दिल्याने डॉ. तुकाराम रोंगटे यांच्यासारखे व्यक्ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख होऊ शकतात.’ तसेच त्यांनी डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या साहित्याची चर्चा करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर व्यवस्था बदलून टाकण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. ‘आदिवासींचेही बाबासाहेब’ या ग्रंथाचा परिचय करून देताना यांनी विचार व्यक्त केले.
डॉ. तुकाराम रोंगटे ह्यांच्या साहित्यावरील एकूण चार सत्रात पार पडली. यामध्ये सत्राध्यक्ष म्हणून डॉ. राजाभाऊ भैलूमे, प्राचार्य डॉ. महादेव वाळूंज, डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. वसंत गावडे इत्यादि मंडळींनी सत्राध्यक्ष म्हणून बजावली. तसेच डॉ. कैलास महाले, डॉ. संजय मेस्त्री, डॉ. विठ्ठल केदारी, प्रा. सुशील धसकटे, डॉ. अनिल वळवी, डॉ. मैजोद्दिन मुतवल्ली, यशवंत भांडकोळी, प्रा. शुभलक्ष्मी गावकर, डॉ. अतुल चौरे, डॉ. सुनील घनकुटे, डॉ. चिंतामण धिंदळे, डॉ. ज्ञानेश्वर तिखे, डॉ. योगेश शेळके, इत्यादि अभ्यासकांनी चर्चासत्रात सहभाग नोंदवून डॉ. तुकाराम रोंगटे ह्यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणली.
चर्चासत्राच्या शेवटच्या सत्रात डॉ. तुकाराम रोंगटे यांची प्रकट मुलाखत डॉ. नम्रता कदम आणि डॉ. हरेश शेळके यांनी घेतली. या मुलाखतीमधून लेखकाचा जीवन आणि शैक्षणिक, साहित्यिक वाटचाल याविषयीची माहिती घेण्यात आली. तसेच लेखकाच्या सर्वांगीण कामगिरीचा लेखाजोखा या मुलाखतीद्वारे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. तसेच डॉ. तुकाराम रोंगटे यांचा परिचय डॉ. उमेश सिरसट यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के, डॉ. अमोघसिद्ध चेंडके, डॉ. सुमित साळुंखे, डॉ. सदाशिव शिंदे यांनी केले. चर्चासत्रासाठी विविध क्षेत्रांतील मंडळी, प्राध्यापक, कर्मचारी आणि पीएचडी संशोधक विद्यार्थी, एम ए चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्रासाठी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे डॉ. अनिल पवळ यांनी आभार व्यक्त केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!