गावगाथा

खैराट शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

दिनविशेष

खैराट शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
अक्कलकोट (प्रतिनिधी) : ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथील जि.प. खैराट शाळेत हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील होनाजे होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. रेखा लक्ष्मण सोनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा, माहितीपर गीते सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणातून महाराजांच्या जीवनातील छोटे-छोटे प्रसंग सांगून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.
१९ फेब्रुवारी हा सोनेरी दिवस असल्याचे नमूद करत वक्त्यांनी सांगितले की, शिवनेरी किल्ला येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला. शिवाई देवीच्या नावावरून बाळराजांचे नाव ‘शिवाजी’ ठेवण्यात आले. राजमाता जिजाऊंच्या संस्कारात महाराज वाढले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला आत्मसात केली. लहान वयातच मावळ्यांना सोबत घेऊन रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता, स्वाभिमान, मानवतावाद आणि नितीमत्ता यांसारख्या गुणांनी परिपूर्ण असलेल्या शिवाजी महाराजांचे कार्य अजोड असून त्यांच्या कार्याची गाथा उच्चारताच अंगावर रोमांच उभे राहतात, असे मत सौ. रेखा सोनकवडे यांनी व्यक्त केले. “छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मातृभूमीला लाभलेले बहुमूल्य वरदान आहे. त्यांनी पेटविलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात फिरोजा नदाफ यांनीही शिवाजी महाराजांविषयी माहिती देत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button