महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचा १५ वा वर्धापन दिन संपन्न वर्धापनदिनी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन
वर्धापन दिनानिमित्त विशेष

महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचा १५ वा वर्धापन दिन संपन्न
वर्धापनदिनी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

मुरुम, ता. उमरगा, ता. १३ (प्रतिनिधी) : महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या सुसज्ज असणाऱ्या इमारतीत मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील, मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. महेश आर्दाळी, मधुमेहतज्ञ डॉ. श्रेय आराध्ये, चंद्रशेखर मुदकन्ना, डॉ. तेजस्विनी सोनवणे, डॉ. कावेरी पाटील, डॉ. गुंडाजी कांबळे, डॉ. महेश स्वामी, डॉ. निलेश मासुर्णे, उपाध्यक्ष शरणप्पा मुदकन्ना, सचिव कमलाकर जाधव, भीमराव वरनाळे, प्रा. दत्ता इंगळे, सुरेश मंगरूळे, श्रीशैलप्पा बिराजदार, आनंदराव बिराजदार, बाबासाहेब पाटील, मनिष मुदकन्ना, अमृत वरनाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे म्हणाले की, संस्थेची स्व:ताच्या मालकीची सुसज्ज इमारत असून सभासदांना तत्पर सेवा देण्यास संस्थेचे कर्मचारी वृंद नेहमीच प्रयत्नशील असतात. संस्थेचे कामकाज संपूर्ण संगणकीकृत असून मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर, तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध कर्ज योजना, हायरपरचेस कर्जाची सुविधा या संस्थेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ठ्ये असल्याने सभासद पतसंस्थेच्या कारभाराविषयी समाधानी आहेत. सर्वसामान्यांच्या विश्वासास एवढ्या कमी कालवधीमध्ये अधिराज्य गाजवणारी, अशी या पतसंस्थेने आपली ओळख निर्माण केली आहे. यावेळी प्रा. दत्ता इंगळे, डॉ. नितीन डागा यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरुन बोलताना आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, सध्याच्या स्थितीत पतसंस्था चालविणे म्हणजे तारेवरची कसरत असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळाने पतसंस्थेतील ठेवीदार वाढविण्याचा प्रयत्न करून पतसंस्था कायमच दरवर्षी नफ्यात ठेवली आहे. पतसंस्थेचा लेखाजोखा पाहून पतसंस्था दरवर्षी नफ्यात आहे, हे ऐकून मला आनंद होत आहे. पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देवून बँकेच्या वाटचालीबद्ल कौतुक केले. यापुढेही अधिक जोमाने काम करून या पतसंस्थेची प्रगती कशी होईल, याकडे लक्ष देऊन पतसंस्थेचा आलेख अधिकाधिक कसा वाढेल. शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची अडचण जाणवल्यास त्याबाबतीत मी सातत्याने तुमच्या सोबत असून सर्व अडचणी दूर करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. चौगुले यांच्या हस्ते आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, प्रशांत काशेट्टी, महांतय्या स्वामी, संतोष मुदकन्ना आदिंनी परिश्रम घेतले. ज्ञानराज चौगुले यांनी प्रारंभी बीपी व शुगर चेक करून घेतले. आरोग्य शिबिरासाठी सोलापूर येथील हृदयम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व आराध्येज मल्टीस्पेशालिटी क्लिनिक यांच्यासह श्रीकृष्ण रक्तपेढीचे सहकार्य लाभले. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील बसवेश्वर पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना आ. ज्ञानराज चौगुले, शिवशरण वरनाळे, डॉ. शैलेश पाटील, डॉ. महेश आर्दाळी, डॉ. श्रेय आराध्ये, चंद्रशेखर मुदकन्ना, डॉ. तेजस्विनी सोनवणे, डॉ. कावेरी पाटील, डॉ. गुंडाजी कांबळे, डॉ. महेश स्वामी व अन्य.
