सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष अनुभव; जेऊर शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी परिसर भेट
जेऊर (प्रतिनिधी) – जि. प. प्राथमिक मराठी केंद्र शाळा, जेऊर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या तब्बल २१० विद्यार्थ्यांनी अलीकडेच परिसर भेटीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी स्थानिक शेतकरी सुरेश मामा बोरीकरजगी यांच्या सेंद्रिय शेतास भेट देत आधुनिक व नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

विद्यार्थी शेतात पोहोचताच त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुरेश मामा बोरीकरजगी यांच्या चिरंजीव परशुराम बोरीकरजगी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शेतात पिकवलेल्या उसाचा थंडगार व ताजा रस देण्यात आला. ग्रामीण वातावरणात मिळालेल्या या आगळ्या-वेगळ्या आदरातिथ्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना गहू, ज्वारी, ऊस, करडई, हरभरा तसेच लिंबाच्या बागेची माहिती देण्यात आली. गांडूळ खत प्रकल्प, गोमूत्र साठवण, बाग व्यवस्थापन, कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विशेषतः ठिबक सिंचन पद्धतीसारख्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना शेतीतील पाण्याची बचत आणि उत्पादनवाढ याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सोलापूरची खास मेजवानी—खीर व चटणी—यांचा आस्वाद घेतला. त्यानंतर गाणी, कविता, गोष्टी, नृत्य यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. तसेच कुस्ती, टेनिस यांसारखे विविध खेळही घेण्यात आले. या उपक्रमांमुळे परिसर भेट अधिक रंगतदार ठरली.

कार्यक्रमास जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख कृष्णात मोरे, मराठी शाळेचे मुख्याध्यापक अमसिद्ध उमराणी, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक राजशेखर पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक पंडित गुरव, पोलीस पाटील रहमान अत्तार तसेच केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनार यांनी केले तर आभार प्रदर्शन नागप्पा आळगी यांनी केले.
परिसर भेट यशस्वी होण्यासाठी संगमेश्वर कोणदे, उर्मिला शिवगुंडे, संध्याराणी माने, स्नेहलता क्षीरसागर, सुमित्रा जमादार, धरेप्पा तळवर, रसवंतीगृह तसेच पालक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ही परिसर भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरली. पुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!