गावगाथा

*सूर्यकांत ​घिवारे यांच्या कविता जीवनाचे वास्तव मांडणाऱ्या* *श्रीकांत मोरे*

प्रकाशन सोहळा

*सूर्यकांत ​घिवारे यांच्या कविता जीवनाचे वास्तव मांडणाऱ्या*
*श्रीकांत मोरे*
———————————————
​सोलापूर दि.९ – “कवी सूर्यकांत घिवारे यांच्या कविता या केवळ शब्दरचना नसून त्या जीवनाचे मार्मिक भाष्य करणाऱ्या आहेत. बदलत्या समाजाच्या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटते. त्यांच्या कवितेत लय, सूर आणि शब्दांची नाविन्यता असल्याने त्या वाचकांच्या मनाला थेट भिडतात,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद, पश्चिम सोलापूर (मनोरमा) शाखेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी केले.
​कवी सूर्यकांत घिवारे यांच्या ‘शब्द परिमल’ या नव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोलापुरात मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर यांनी हा संग्रह प्रकाशित केला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून श्रीकांत मोरे बोलत होते.
​कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहायक सचिव डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले की, घिवारे यांच्या कवितेत नात्यांमधील जिव्हाळा शब्दांच्या पलीकडे जाऊन मांडलेला दिसतो. त्यांच्या रचनांमध्ये पारंपरिक भावनेचा ओलावा जपलेला आहे. तर ​मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी कवीच्या संवेदनशीलतेचे कौतुक करताना सांगितले की, “शासकीय सेवेत कार्यरत असूनही घिवारे यांनी स्वतःमधील कवितेचा हळवा कोपरा जिवंत ठेवला आहे. त्यांच्या कविता मानवी आयुष्यातील विविध क्षणांचा आणि काळाचा वेध घेतात.”
​प्रसिद्ध कवयित्री व लेखिका डॉ. कविता मुरुमकर यांनी या कवितांमधील सकारात्मकतेवर प्रकाश टाकला. घिवारे यांच्या कविता संयमी, विवेकी आणि संवेदनशीलता जपणा-या असल्याचे त्यांनी नमूद केले. तर मसाप पश्चिम सोलापूरच्या उपाध्यक्षा शोभा मोरे यांनी या कवितांमधील ‘सच्चेपणा’ अधोरेखित केला आणि संग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन केले.
​ ​याप्रसंगी मंचावर ऊर्मिला घिवारे, प्रकाशक राजेंद्र भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र भोसले यांच्या प्रास्ताविकाने झाली. कवी सूर्यकांत घिवारे यांचे मनोगत प्रा. अर्चना घिवारे-भुंजे यांनी वाचून दाखवले, तर दिग्विजय भुंजे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना कुलकर्णी यांनी केले आणि आभार प्रा.अर्चना घिवारे-भुंजे यांनी मानले. या सोहळ्याला शिवप्रज्ञा प्रकाशनाच्या राजश्री भोसले, कवी गोविंद काळे, डॉ. रामचंद्र धर्मसाले, प्रा. नरेंद्र गुंडेली, सुधाकर गायकवाड, नितीन शहाणे यांच्यासह सोलापुरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​ —————————
*फोटोओळी* -सूर्यकांत घिवारे यांच्या ‘शब्द परिमल’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी- डॉ. शिवाजी शिंदे, राजेंद्र भोसले, श्रीकांत मोरे, शोभा मोरे, सूर्यकांत घिवारे, ऊर्मिला घिवारे, डॉ. कविता मुरूमकर, पद्माकर कुलकर्णी, वंदना कुलकर्णी, राजश्री भोसले, माधवी घिवारे-भिंगरे.
——————————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button