श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून गोरगरीब कुस्तीगरांना खुराक कीट वाटप
अक्कलकोट -श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सराव करणाऱ्या गोरगरीब कुस्तीगरांसाठी ‘स्वामींचा प्रसाद’ स्वरूपात खुराक कीटचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत फेब्रुवारी महिन्यातील ७८ कीटचे वितरण बुधवारी करण्यात आले.
तालुक्यातील अनेक पैलवान कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदी ठिकाणी जाऊन कुस्तीचा सराव करीत आहेत. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन न्यासाकडून मकर संक्रांतीच्या दिवशी (जानेवारी महिन्यात) या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. प्रारंभी ५० कुस्तीगरांना कीट देण्यात आले होते.
गेल्या ३७ वर्षांपासून अविरत अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संपूर्ण देशभर ख्यातनाम आहे. दररोज लाखो भाविकांना महाप्रसादाचा लाभ देणाऱ्या या मंडळाने आता सामाजिक बांधिलकी जपत कुस्तीगीरांच्या पोषणासाठीही पुढाकार घेतला आहे.
प्रतीमहिना दिल्या जाणाऱ्या या खुराक कीटमध्ये तूप, बदाम, खारीक, बडीशेप, खसखस, इलायची, धने आदी पौष्टिक घटकांचा समावेश असून तो ‘श्रींचा प्रसाद’ म्हणून कुस्तीगरांना प्रदान केला जात आहे.
तालुक्यातील चांद्या ते बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा विशेष टीममार्फत सर्वेक्षण करून ७८ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. या कार्यासाठी महाराष्ट्र केसरी पै. मौला शेख बादोला, पै. महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्यासह मनोज निकम, सौरभ मोरे, प्रवीण देशमुख, योगेश पवार, प्रथमेश पवार, प्रवीण घाटगे, प्रसाद मोरे, योगेश कटारे, भरत राजेगावकर, बाळासाहेब पोळ, गोटू माने, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी तसेच सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे तालुक्यातील गरजू कुस्तीगरांना मोठा आधार मिळत असून सामाजिक क्षेत्रात मंडळाच्या कार्याची प्रशंसा होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!