Pune crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेला पोलिस हवालदार गणेश जगताप याला आंध्रा तून अटक
पुणे (प्रतिनिधी): फसवणूकीच्या प्रकरणात फरार झालेल्या निलंबित पोलीस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जगताप याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, चतु:शृंगी, कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
फसवणूक प्रकरणात गु्न्हे दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. जगताप याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. एका ब्युटी पार्लर चालक महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जगतापविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोथरूड भागातील एका महिलेची ७३ तोळे सोन्याचे दागिने, तसेच १७ लाख रुपयांची फसवणूक केली होती. ओैंधमधील एका सराफ व्यावसायिकाची त्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाचा वापर करुन फसवणूक केली होती. त्याच्याकडून आठ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केल्यानंतर त्याने पैसे दिले नव्हते.विशेष शाखेत नियुक्तीस असलेल्या जगताप याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर जगताप फरार झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध घेण्यात येत होता.
आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात असलेल्या फूलपथरू गावात जगताप वास्तव्यास असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड यांनी ही कामगिरी केली. जगताप याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वी जगताप याला अटक करण्यात आली होती. राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी जगतापने खोटी कागदपत्रे सादर केली होती. सेवा पुस्तिकेतील पान फाडून त्याने पोलीस आयुक्तालयातील लिपिकांशी संगनमत करुन दुसरे पान चिटकविले होते. शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी जगताप याच्यासह दोन लिपिकांना वानवडी पोलिसांनी अटक केली होती.



