गावगाथा

राज्यातील साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषीमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

राज्यातील साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
कृषीमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन
पुणे, दि.२२ : (जिमाका वृत्तसेवा): देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा उसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्यावतीने सहकार्य येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर, सहकार आयुक्त दीपक तावरे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड,द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एन. चिनप्पन, द डेक्कन शुगर टेकनोलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
श्री. भरणे म्हणाले, साखर व्यवसायात काम करीत असताना विविध अडअडचणी येत असतात, या अडचणीवर मात करण्याकरिता उपाययोजना केल्या पाहिजे. या क्षेत्राच्या प्रगतीकरिता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. नवीन वाण विकसित आणि त्या माध्यमातून अधिकाधिक ऊस उत्पादन तसेच साखरेचा उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, या सर्व बाबींचा शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे, यादृष्टीने असोसिएशनने मार्गदर्शन केले पाहिजे.
*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार*
राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे प्रशासनाच्यावतीने पंचनामे करण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनो घाबरू नका, या संकटाच्याकाळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल,असे आश्वासन श्री. भरणे यांनी दिले.
*द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन*
जागतिक पातळीवर असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर साखर व्यवसायात झाला पाहिजे, अधिकाधिक ऊसाचे उत्पादन आणि बाजारभाव मिळण्याच्यादृष्टीने लालचंद हिराचंद यांनी द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या माध्यमातून राज्यासह इतर राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांना मार्गदर्शन होत असल्याबद्दल श्री. भरणे यांनी असोसिएशनचे अभिनंदन केले.
*साखर उत्पादनासोबतच उपपदार्थाची निर्मिती काळाची गरज-बाबसाहेब पाटील*
श्री. पाटील म्हणाले, भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, साखर हा राज्यातील मोठा उद्योग आहे. देशाच्या प्रगतीत साखर उद्योगाच्या माध्यमातून खूप मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी आणि एमएसपी यांचा मेळ घालून व्यवसाय करावा. संचालक मंडळाने निर्णय घेतांना कारखान्याची आर्थिक परिस्थिती, उत्पादन, कामगाराचे वेतन, मुकादम, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, उसदर आदी घटक विचारात घेऊन निर्णय घेतले पाहिजे. साखर कारखान्यांना येणाऱ्या अडअडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया.
उत्कृष्ट काम करणाऱ्या साखर कारखान्यांच्या इतर कारखान्यांनी अनुकरण करत पारदर्शकपणे कारभार केला पाहिजे तसेच शेतकऱ्यांचेहीतही जपले पाहिजे. साखर उत्पादनासोबतच पेट्रोल, विमान इंधन असे विविध उपपदार्थ निर्माण करणे ही काळाची गरज आहे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन श्री. पाटील म्हणाले.
साखर आणि संबंधित उद्योगाच्या सर्व पैलूंचा समावेश असलेली कार्यक्षमता आणि उत्पादकता यामध्ये सुधारणा करण्याकरिता समर्पित असलेली द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन आहे. ७० व्या वार्षिक अधिवेशनाच्या माध्यमातून साखर कारखान्यांकरिता विविध कल्पना, प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाचा विकास होईल आणि यामाध्यमातून रासायनिक आणि प्रक्रिया घटकात खर्च कमी होण्यास मदत होईल. या अधिवेशनात नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचे आदान प्रदान होईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
श्री. अनास्कर म्हणाले, साखर कारखान्याकरिता आर्थिक नियोजन महत्वपूर्ण असल्याने कारखान्यांनी व्यावसायिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, याबाबत असोसिएशनने तांत्रिक बाबीसोबतच आर्थिक नियोजनाबाबतही आगामी काळात मार्गदर्शन केले पाहिजे, याकरीता सहकारी बँकेच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. अनास्कर म्हणाले.
कार्यक्रमापूर्वी मंत्री श्री.भरणे आणि श्री. पाटील यांच्यासह मान्यवरांनी साखर प्रदर्शनाअंतर्गत असलेल्या दालनाला भेट देऊन तंत्रज्ञान, उत्पादन आदी बाबी विषयी माहिती घेतली.
यावेळी श्री. भरणे यांच्या हस्ते ७० व्या वार्षिक अधिवेशनानिमित्त कार्यवृत्त पुस्तिकेचे (प्रोसीडिंग्ज बुक) प्रकाशन यावेळी करण्यात आले.
*मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित*
श्री. भरणे यांच्या हस्ते द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचा साखर उद्योग गौरव पुरस्कार, सर्वोत्तम साखर कारखाना पुरस्कार, तांत्रिक उत्कृष्टता पुरस्कार, औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
श्री. भड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button