Akkalkot: वटवृक्ष मंदिरात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा ; हजारो सुवासिनींनी मनोभावे केली स्वामींच्या वटवृक्षाची पुजा
अक्कलकोट (प्रतिनिधी): आज श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने पार पडला. भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेस व वडपुजेस अनन्यसाधारण महत्व आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासूनच असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा केला. याप्रसंगी बोलताना देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांनी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील साक्षात श्री स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या वटवृक्षास धार्मिक व ऐतिहासिक महत्व असल्याने येथे दरवर्षी वटपौर्णिमेस वडपुजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरु केलेली ही वडपूजा परंपरेप्रमाणे दरवर्षी स्वामींच्या दरबारी साजरी करतात. वटवृक्ष हा हिंदू धर्मातील भारतीय संस्कृतीचा व भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. म्हणूनच स्वामी समर्थांनी अक्कलकोट ला आल्यानंतर या वटवृक्ष खालील स्थानाची निवड करून आपले वास्तव्य येथे कायमचेच जागृत ठेवले आहे. या वटवृक्षाच्या माध्यमातून नेहमीच भाविकांना स्वामींच्या जागृतीची प्रचिती येथे येत असते, त्यामुळे वटपौर्णिमेस येथील वटवृक्षास वड पूजा केल्याने वटपौर्णिमेची सुवासिनींनी केलेली ही पूजा साक्षात स्वामींनाच समर्पित होऊन महिला भाविकांची मनोकामना पूर्ण होत असल्याची अनेक महिला भक्तांना आजवर प्रचिती आलेली आहे. यानिमित्ताने अनेक महिला भक्तांची दरवर्षी वटपौर्णिमेला वटवृक्षास वडपूजा करण्यासाठी येथील गर्दी वाढतच असल्याचे मनोगत व्यक्त केले.
वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक महिला भक्तांनी वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षास वडपूजा करून आपले जीवन सार्थक झाले आहे. या वटवृक्षाच्या रुपातून साक्षात श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद आपणास लाभले असल्याचे मत काही महिला भगिनींनी व्यक्त केले. तसेच वटपौर्णिमा असल्याने श्रींच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. पहाटे ५ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. भाविकांच्या दर्शनाकरिता मंदिर समितीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. तसेच भक्तांच्या दर्शनाच्या व इतर सोयीकरिता व त्यांच्या सुरक्षिततेकरिता समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी देवस्थानचे मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीनिवास इंगळे, संतोष पराणे, दीपक जरिपटके, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पवार, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी व इतर उपस्थित होते.