गावगाथाठळक बातम्या

गावगाथा विशेष : “गावगाथा” दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार जाहीर ; स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने घेतली दखल

पाटण (प्रतिनिधी) : आपल्या ग्रामीण संस्कृती, रूढी, परंपरा व ग्रामीण साहित्याने समृद्ध म्हणून नाव लौकीक केलेल्या “गावगाथा” या दिवाळी अंकाची दखल घेत “स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट” च्या वतीने उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. 

“गावगाथा” दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष असून ग्रामीण संस्कृती रूढी परंपरा व ग्रामीण साहित्य या ग्रामीण भागातील लेखकांना व्यासपीठ मिळावे म्हणून मागील तीन वर्षांपासून दिवाळी अंक प्रकाशन केले जात आहे. वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ दर्जेदार साहित्यामुळे अल्पावधीतच गावगाथा दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरला आहे.

यंदा पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या स्पंदन दिवाळी अंक स्पर्धेस संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा अखंडपणे जपण्यासाठी स्पंदन दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

स्पर्धेत तब्बल 100 दिवाळी अंक आले होते. त्यामधून महासागर, अवतरण-सकाळ, सुभाषित, तेजोमय, कालनिर्णय, शब्दवेल, धगधगती मुंबई, कृष्णाकाठ, गुंफण, सृजनदीप, तरुण भारत, आर्याबाग, शब्द शंकरपाळी,गावगाथा, सृजनसंवाद, सुप्रभा, अक्षरदान, रंगबावरी, कमांडर या अंकांना स्पंदन उत्कृष्ट दिवाळी अंकांचा सन्मान मिळाला आहे. या विजेत्यांना सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने शेकडो नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार इ.नी गौरवण्यात आले आहे. याशिवाय याच कार्यक्रमात सेल्फी विथ गुढी स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार, प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.21 डिसेंबर, 2024 रोजी कराड जि.सातारा या ठिकाणी दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button