गावगाथा

“शाळेमुळेच माझे नाव, हा कृतज्ञतेचा भाव” ‘अनंत चैतन्य प्रशाला माझे मंदीर, या शाळेतील शिक्षक माझे देव.’ –प्रसाद दत्तात्रय पांढरे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडखळ पोलीस ठाणे, रायगड

आपल्या शाळेबद्दल आठवणी

“शाळेमुळेच माझे नाव, हा कृतज्ञतेचा भाव”
‘अनंत चैतन्य प्रशाला माझे मंदीर,
या शाळेतील शिक्षक माझे देव.’ –प्रसाद दत्तात्रय पांढरे 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडखळ पोलीस ठाणे, रायगड

 

HTML img Tag Simply Easy Learning    

महान युगपुरुष स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरित होऊन, ” उद्य्यमेन ही सिद्य्यंति कार्याणि न मनोरथै ” हे ब्रीदवाक्य घेऊन खऱ्या अर्थाने समाजकल्याणाचा वसा घेतलेल्या कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या व बंधूद्वयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या माध्यमातून सुरू केल्या गेलेल्या हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेचे अनेक विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर सातासमुद्रापारही विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत.या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री.सचिन कल्याणशेट्टी देखील याच शाळेचे विद्यार्थी ज्यांची आज सामाजिक व राजकीय क्षेत्रातील यशोमय वाटचाल सर्वश्रुत आहे. एका छोट्याशा खेड्यातून लावल्या गेलेल्या या इवल्याशा रोपाचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.याच्या पारंब्या विस्तारल्या आहेत. या संस्थेने अनेक “समाजरत्न” निर्माण केले आहेत. अशांचा मागोवा घेत सर्वांचे शक्य नाही पण कांही निवडक अशा या शाळेच्या “माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा” त्याच्यांच शब्दात मांडण्याचा हा प्रपंच.
—————————————-
-” शाळेमुळेच माझे नाव, हा कृतज्ञतेचा भाव”
‘अनंत चैतन्य प्रशाला माझे मंदीर,
या शाळेतील शिक्षक माझे देव.’
—————————————- अक्कलकोट तालुक्यातील पितापूर हे एक हजार -बाराशे लोकवस्ती असलेले छोटेसे खेडे. या गावातही शिक्षणाची तशी वाणवाच. अनेक सोयी- सुविधां च्या तुटवड्यामुळे इथल्या मुलांना शिक्षणाची ओढ तशी कमीच.त्यात “दुष्काळात तेरावा महिना”या म्हणीप्रमाणे वरुन संथ गतीने वाहत येणारी पुढे हन्नूरवरून कुरनूर धरणाला जाऊन मिळणारी हरणा नदी.गावच्या अल्याड आमची शेती आणि शेतीत आमची वस्ती.यामुळे शाळा नदी पल्याड गावात असल्याने पावसाळ्यात पाण्याचा अंदाज घेऊन नदी ओलांडून कसरत करत जावे लागत असे नाहीतर सुट्टी घ्यावी लागे. इथे कसेबसे चौथी पर्यंतची शाळा पूर्ण झाले. पुढील शिक्षणाची सोय गावात नसल्याने शेजारील गावात जाणे भाग होते. त्यामुळे जवळचे बोरेगाव,नन्हेगाव आणि हन्नूर हे माझ्या माध्यमिक शिक्षणाचे ठिकाण होते. शिक्षणाचे महत्व माझ्या आई- वडिलांना होतेच त्यामुळे त्यांनी आपले अस्तित्व स्वकर्तृत्वावर उभे केले होते.यामुळेच त्यांचे मार्गदर्शन व प्रेरणा माझ्या शैक्षणिक वाटचालीस दिशादर्शक ठरले. संपूर्ण परिसरातील गावात कुठेच हायस्कूल नव्हते त्यामुळे शिक्षणातून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करायला संधी नसल्याने इच्छा असूनही क्षमता राखून असलेली अनेक मुले आपली प्रतिभा व कौशल्य दाखवू शकत नव्हते.मात्र हन्नूर गावातील एक सुशिक्षित, सुसंस्कृत व आदर्श असे कल्याणशेट्टी कुटुंब , ज्यांच्या घरात सगळेच बांधव शिक्षक होते. त्यांनी या परिसरातील सर्वच गावच्या मुलांच्या शिक्षणाचा विडा उचलला व ते शिवधनुष्य पेलले.
आणि अनंत चैतन्य प्रशाला ही शाळा सुरू केली. या हन्नूर पंचक्रोशीतील मुलां- मुलीसाठी जणू एक वरदानच ठरले.अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत सुरू करण्यात आलेल्या या शाळेने आज मारलेली भरारी, गाठलेली उंची, ज्या जोमाने व जिद्दीने यशाच्या अतिउच्च शिखरावर पोहचली आहे हे पाहून माझ्या मनाला ह्याचा आनंद स्वर्गाहून सुंदर आहे. तसा मी या शाळेचा दहवीचा १९८९ चा तिसऱ्या बॅचचा विद्यार्थी. अतिशय आत्मीयतेने शिकवणारे शिक्षक या शाळेत मला लाभले हे माझे अहोभाग्य. आद्य होते माझे प्राचार्य श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सर.अतिशय प्रभावी, कमालीचे नियंत्रण व नियमन असलेले, आत्मविश्वासाने भरलेले, जितके दिसायला सुंदर तितकेच आतून सुंदर असे माझे आदर्श व आवडते व्यक्तिमत्त्व त्यांचे मार्गदर्शन सोपे व सुलभ असायचे आणि सरळ लक्षात राहायचे हे विशेष. त्यांनी शिकवलेले मी पुन्हा कधी वाचले नाही सरळ परीक्षेत उत्तर लिही पर्यंत जसेच्या तसे लक्षात राहायचे.
अनेक अडचणी, गैरसोय असूनदेखील तत्कालीन माझे आदरणीय शिक्षक श्री. आंदोडगी सर ( गणित व सायन्स) ह्या सरांचे शिकवणे इतके सहज व सोपे होते की त्यांच्या विषयात आपण नापास होणार नाही असा विश्वास निर्माण करणारे होते, कमालीचे सख्त आणि शिस्तप्रिय सर्वांचे लाडके. व आदरणीय श्री. कलबुर्गी सर ( इंग्लिश) ग्रेट सर. इंग्लिश वर जबरदस्त प्रभुत्व. तेच विद्यार्थ्यांत निर्माण करण्याची जिद्द शिकवण्यात होती. श्री. मत्तेखाने सर ( हिंदी) छान हिंदी शिक्षक मोजके बोलणे, स्वयंशिस्त आणि उच्च दर्जाचे वर्तन, श्री. बिराजदार सर ( हिंदी) देवमाणूस, श्री. चिकलंडे सर आमच्या सर्वांचे आवडते सर, बंडगर सर ( गणित) बुद्धिमत्तेचे धनी असलेले व्यक्तिमत्त्व. गणितात यांच्यासम ज्ञानी मी पाहिला नाही पण तितकेच नम्र वर्तन, आचरण, साधे पण उच्च दर्जाचे, माझ्या गावचे व्हनमाने सर ( इतिहास, भूगोल) अत्यंत कडक व शिस्तप्रिय आणि शाळेप्रती शंभर टक्के समर्पणाची भावना असलेले व्यक्तित्व.या सर्वांनी आमच्या शैक्षणिक जडणघडणीत कोणतीही कसर सोडली नाही. कमालीचा आपलेपणा तर त्यांच्यात होताच शिवाय आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी सर्वस्व पणाला लावून आम्हाला शिकवण्याची त्यांची तळमळ त्यांच्याप्रती ईश्वरासम आदर निर्माण करुन गेली. आजही त्यांची आठवण आली की आदराने नतमस्तक होतो आम्ही.
जगात आई- वडिलानंतर आपल्या मुलांचे कल्याण झाले पाहिजे, हित झाले पाहिजे, चांगले झाले पाहिजे असे कोणाला वाटत असेल तर ते शिक्षक आहेत याची प्रचिती इथेच आली तेंव्हापासून आम्ही शिक्षकांचा आदर आई- वडिलांसम करतो हे सत्य आहे.
आज मी जे कांही आहे त्याचा पाया या पवित्र अशा अनंत चैतन्य प्रशाला, हन्नूर व या शाळेतील तत्कालीन माझ्या आदरणीय प्राचार्य व गुरुजनांनी रचला आहे. या शाळेतील सर्वच जण आपलेपणाने ही शाळा माझी आहे, ती मोठी झाली पाहिजे या हेतूने प्रेरित होऊन कर्तव्य बजावत होते. त्यात महत्त्वाचे शाळेचे शिपाई श्री. मारुती बाळशंकर,श्री.स्वामीनाथ कोरे, श्री. विश्वनाथ सैदे,श्री.शिवप्पा घोडके यांचे योगदान मोठे आहे त्यांच्यातील उच्च दर्जाच्या कमालीच्या आपलेपणाने जे स्थान माझ्या ह्रदयात निर्माण झाले आहे ते आजही आदरपूर्वक जसेच्या तसे आहे.दहावी पास होण्याचा आनंद इतका मोठा होता की आजही तो जसाच्या तसा आठवतो. मला जणू आकाशात चालल्याचा भास होत होता. मी हवेत तरंगत असल्याची जाणीव होत होती. तसा अविस्मरणीय निर्मळ आनंद या शाळेनी व शिक्षकांनी मला मिळवून दिला म्हणून माझ्यासाठी मंदीर आहे अनंत चैतन्य प्रशाला व या शाळेतील तत्कालीन शिक्षक व शिपाई हे माझे दैवत आहेत.
—————————————-
MPSC मार्फत पोलीस अधिकारी म्हणून निवड कशी झाली. —
—————————————-
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी अकरावी ते पदवी पर्यंत चे शिक्षण सोलापूर शहरातील नामवंत असे हिराचंद नेमचंद कॉलेज, बाळीवेस व दयानंद महाविद्यालय येथे झाले. येथून मी बी. कॉम. ची पदवी प्राप्त केली. याच काळात मी अभ्यासासोबतच व्यायामाकडे विशेष लक्ष दिले.बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षात त्याकाळी सोलापुरात अकाऊंट विषयाच्या ट्युशनसाठी प्रसिद्ध असलेले श्री. के. पी. सर ( कल्याणराव पाटील सर) यांनी केलेल्या मार्गदर्शनाने माझ्या जीवनात कमालीचे बदल घडवून गेले.माझे स्वर्गीय मोठे बंधू श्री. बाबासाहेब पांढरे यांचा माझ्या शिक्षणासाठी असलेला आधार, माझ्या प्रती असलेला त्यांचा विश्वास यामुळे माझ्या मनात त्यांच्या विषयी एक सर्वोच्च अशा प्रकारचा आदरभाव निर्माण करुन होता व तो आजही आहे. त्यामुळे माझ्याकडून कोणतेही गैरवर्तन घडले नाही. माझ्या भावाच्या नजरेतून मी उतरु नये याची काळजी मला नेहमीच असायची.त्याच्यामुळेच मला व्यायामाची आवड निर्माण झाली.५००० मीटर (५ किमी) धावणे या खेळ प्रकारात मी दयानंद महाविद्यालय, सोलापूर कडून कोल्हापूर विद्यापीठात खेळाडू म्हणून खेळलो आहे.
आदरणीय के. पी. सर ( कल्याणराव पाटील सर) यांनी दिलेले लेक्चर स्वकर्तृत्वावर आपले अस्तित्व निर्माण करण्याची उर्जा देऊन गेले. सर स्वतः चार्टर्ड अकाऊंटट होते. सर सांगायचे मोठमोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे हिशोब (ऑडिट) करण्यासाठी रांगेत उभे राहतात त्यांना समाजात वावरताना स्वतः ची ओळख सांगावी लागते की मी C. A. आहे. आपण असे बना की,स्वत:ची ओळख स्वतः ला करून देण्याची वेळ आपणावर नाही आली पाहिजे.अख्खा समाज आपणास ओळखला पाहिजे.लाल दिव्याच्या गाडीत फिरणारी पोस्ट मिळवा आणि मग पहा आपले जीवन कसे आनंदी होते ते. सरांच्या याच प्रेरणादायी विचाराने मी भारावून गेलो, एक जिद्द माझ्या मनात निर्माण झाली.याला अंतिम स्वरूप प्राप्त करून दिली असे माझे स्वर्गीय मोठे बंधू श्री. बाबासाहेब पांढरे यांनी. मला त्यांनी विचारले बी. कॉम. नंतर पुढे काय करणार? मी सांगितले की, मी MPSC मधून पोलीस अधिकारी होणार.त्यासाठी अभ्यासासाठी नाशिक ला जाऊ इच्छितो . त्यांनी कमालीचा विश्वास दिला व संपूर्ण समर्थन देऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी नाशिकला पाठवले. अतिशय समर्पित होऊन, सर्वस्व पणाला लावून मी MPSC परीक्षेचा अभ्यास केला. तिथे मी
१) मंत्रालय असिस्टंट
२) रेल्वे असिस्टंट, स्टेशन मास्टर
३) पोस्ट मास्तर
४) मिलिटरी ऑफीसर
५) BSF ऑफीसर
परीक्षा पास झालो. माझा आत्मविश्वास वाढला. मला पोलीस ऑफीसर च व्हायचे होते म्हणून मी PSI परीक्षेवरच लक्ष केंद्रित केले होते आणि PSI प्रिलीम परीक्षा,मेन परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झालो. फिजिकल परीक्षेत मला 200 पैकी 190 मार्क मिळाले त्यामुळे लेखी व फिजिकल चे मार्क खूप झाले. इंटरव्ह्यू ( तोंडी परीक्षा) मध्ये ही मला चांगले मार्क मिळाले व 1996 MPSC परीक्षेत मी चांगल्या मार्काने पास झालो व माझी MPSC सरळ सेवा पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आणि मला नाशिक पोलीस अकॅडमी मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले. गावात चौथीपर्यंत शाळा असलेला विद्यार्थी शिक्षणाची कास न सोडल्याने व आजूबाजूच्या सर्व गावात शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी झाला. याची अनेक विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली व त्यांनीही अशाप्रकारचे यश MPSC तून मिळवले आहे.
—————————————-
महाराष्ट्र पोलीस दलातील उज्ज्वल कामगिरी—
—————————————-1996 मध्ये एक वर्षाच्या ट्रेनिंग नंतर 1997 मध्ये माझी पहिली पोस्टिंग जगात दोन नंबरची पोलिसिंग असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तालयात झाली. तिथे माझी पहिली पोस्टिंग सर्वात खतरनाक एरिया असलेल्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात झाली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेहरामपाडा, नौपाडा, हुसेन टेकडी, गोळीबार मैदान असे अतिसंवेदनशील असलेले ठिकाण होते. ‘धाडस’ ही माझ्या पितापूर गावची देणगी होती ती इथे माझ्या कामी आले. बेधडक कायदेशीर कारवाई करून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात मी माझी एक चांगली इमेज बनवली. त्याचे बक्षीस म्हणून एकाच वर्षात त्या पोलीस ठाण्यातील ‘स्पेशल अधिकारी, गुंडा अधिकारी ‘ म्हणून माझी निवड झाली. त्या निवडीत केलेली परखड कायदेशीर कारवाई, गुन्हेगारांत निर्माण केलेली वचक, केलेले गुन्हे प्रतिबंध, गुन्हे प्रकटीकरणात केलेली वाढ, रेकॉर्डवरील हार्ड कोर क्रिमिनल विरुद्ध केलेली धाडसी कारवाई, हत्यारांची केलेली जप्ती अशा अनेक कामगिरीमुळे गुन्हेगारांत दहशत निर्माण झाली आणि निर्मलनगर पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील आरोपी कडून गुन्हा करण्याची हिम्मत झाली नाही. या कामगिरीचे बक्षीस म्हणून माझी बदली मुंबई गुन्हे शाखेत झाली व तिथे “ॲंटी नार्कोटिक्स सेल” ( अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मुंबई) येथे नेमणूक झाली. तिथे माझ्या पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीला वाव मिळाला. “नशिले पदार्थ व्यापारातून आपल्या देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अंमली पदार्थांची तस्करी व त्यातून घडविला जाणारा हिंसाचार” ही एक गुन्हेगाराची रीत व शत्रू राष्ट्रांची चाल लक्षात आल्यानंतर त्याला समूळ नष्ट करून आपल्या देशाची भावी पिढी वाचवण्यासाठी कारवाईचा धडाका मी चालू केला. या ठिकाणी मोठमोठ्या कारवाया करण्यात यश आले. त्यात १७ किलो ‘ब्राऊन शुगर ‘ (म्हणजे साधारण त्या काळात त्याची किंमत १७ करोड) पकडून केलेली कारवाई खुप गाजली. ‘टेरिरिस्ट’ सदस्य ला चरससह केलेली अटक, शिवडी खाडीत एकट्याने पाठलाग करून रात्री सामना करून ट्रकसह चरस व चार काश्मिरी आरोपींना पकडून केलेली कारवाई, अनेक केसमध्ये पाहिजे असलेल्या आरोपी सोबत झालेली झटापट व केलेली अटक, 55 किलो चरस,37 किलो चरस,11 किलो चरस, 15 किलो चरस अशा मोठमोठ्या केसेस मुळे अनेक बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आणि आपल्या देशाची भावी पिढीला नशेच्याअधीन होण्यापासून वाचवण्यात यश आले.या सोबतच संपूर्ण मुंबई शहरातील शाळा, कॉलेजमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना गांजा, अफू, चरस, हेरॉईन, कोकेन, मॅड्रेक्स, ब्राऊन शुगर अशा विविध नशिले अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आपल्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणामाविषयी माहिती देऊन त्यापासून दूर राहण्याबाबत केलेली जागृती खुप कामाला आली.या जागृती अभियानाच्या दरम्यान विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर धंदयाबाबत भरपूर माहिती मिळाली आणि बेधडक कायदेशीर कारवाई करून असे सर्व धंदे समूळ नष्ट केले. ॲंटॉप हिल, रे रोड, जेजे मार्ग, अंधेरी गवदेवी डोंगर, शिवडी, डोंगरी, पायधुनी,नागपाडा परिसरात केलेल्या कारवाईमुळे आरोपीं मध्ये ड्रग विकण्याची हिंमत राहिली नाही.मुंबई सोबत ठाणे शहरातील अशा बेकायदेशीर धंदे वाल्यावर कारवाई करून तेही नष्ट करण्यात यश आले. ह्या माझ्या चांगल्या कामगिरीमुळे सन 2002 ते 2007 असे सहा वर्षे या गुन्हे शाखेत कर्तव्य बजावण्याची जी संधी मला मिळाली ती मी माझ्या कारवाई व कामगिरीतून सार्थकी लावली.
यानंतर मुंबई मध्ये 1997 ते 2010 पर्यंत कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील गडचिरोली येथे पदोन्नती द्वारे नेमणूक झाली. तिथे केलेल्या विशेष कामगिरीने मला महाराष्ट्र पोलीस दलातील “खडतर सेवा पदक” व केंद्र सरकारचे “अंतर्गत सुरक्षा पदक” मिळवून दिले. त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालय, मुंबई रेल्वे, ठाणे ग्रामीण आणि आता रायगड जिल्हा येथे केलेल्या एकुण सर्व प्रभावी कामगिरीमुळे मला महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च मेडल १) DG insigania ( पोलीस महासंचालक पदक) सन्मानपूर्वक मिळाले. त्याचबरोबर पोलीस दलासाठी देशातील सर्वोच्च मेडल
२) “राष्ट्रपती पदक” ( प्रेसिडेंट अवार्ड ) मिळाले आहे.
पितापूर सारख्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या व हन्नूर येथील अनंत चैतन्य प्रशालेत शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या मुलाला ही भरारी मारता आली याचा मला मनस्वी आनंद आहेच शिवाय समाजातील प्रचलित म्हणीप्रमाणे जन्मून आपल्या आई – वडिलांचे नाव करावे त्याप्रमाणे मला माझ्या आई – वडीलांचे (सौ.कमल व श्री.दशरथ पांढरे) व माझ्या अनंत चैतन्य प्रशालेचे नाव महाराष्ट्र पोलीस दलातील मुंबई मुख्यालयात व दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात नोंदवण्याचे भाग्य मला लाभले यासम स्वर्गीय आनंद व कर्तव्य समाधान दुजा नाहीच. सर,अनंत चैतन्य प्रशालेचे आभार मानण्याइतके उच्च दर्जाचे शब्द माझ्या संग्रहीत नाहीत जितके मोठे योगदान या शाळेने माझ्या जीवनात दिले आहे.
आज सगळीकडे इंग्रजीचे पेव फुटले आहे. मातृभाषेतील शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आहे. पण खेड्यातील मुले सर्वच क्षेत्रात अव्वल आहेत. मातृभाषेतील शिक्षण सहज अवगत होते.परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यासात सातत्य, कठोर परिश्रमाची तयारी व ध्येयनिश्चीती केल्यास यश हमखास मिळते.
—————————————-
सर, सेवेच्या २८ वर्षानंतर का होईना आपण माझ्या शाळे विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला उपलब्ध करुन दिलात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर.
—————————————-
शब्दांकन – श्री. प्रसाद दत्तात्रय पांढरे ( रा. पितापूर ता. अक्कलकोट)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वडखळ पोलीस ठाणे, रायगड जिल्हा.
संकलन – श्री. अशोक शरणप्पा साखरे
प्राचार्य अनंत चैतन्य माध्य. व उच्च माध्यमिक प्रशाला,हन्नूर.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button