गावगाथा

बसवेश्वरांचे वचन साहित्य आजही प्रकाशमान,वचन साहित्याला साहित्यविश्वाचा मुकुटमणी – शिवानंद गोगाव

राष्ट्रीय सेवा योजना सेवा-संस्कार शिबिर

बसवेश्वरांचे वचन साहित्य आजही प्रकाशमान,वचन साहित्याला साहित्यविश्वाचा मुकुटमणी – शिवानंद गोगाव

HTML img Tag Simply Easy Learning    
अक्कलकोट (प्रतिनिधी) –
१२ व्या शतकात बसवेश्वर ऊर्फ बसण्णा यांनी लिहिलेली वचने आजही समाजाला दिशा देणारी आणि प्रेरणादायी आहेत. त्यामुळे वचन साहित्याला साहित्यविश्वाचा मुकुटमणी म्हटले जाते, असे प्रतिपादन जागतिक लिंगायत महासभेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व बसव अभ्यासक शिवानंद गोगाव यांनी केले.
तालुक्यातील शिरवळ येथील महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना सेवा-संस्कार शिबिरात ‘वाचन साहित्य’ या विषयावर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. या शिबिरात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
शिवानंद गोगाव पुढे म्हणाले की, बसवादी शरणांनी कन्नड भाषेत रचलेले वचन साहित्य केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक मर्यादेत न राहता मानवी मूल्ये, सामाजिक समता आणि विवेकवादी विचारांचा संदेश देणारे आहे. या वचन साहित्याचा अनुवाद आज देश-विदेशातील विविध भाषांमध्ये झाला असून त्याचे जागतिक स्तरावर महत्त्व वाढले आहे. विद्यार्थ्यांनी आपले जीवन सुंदर व अर्थपूर्ण बनवण्यासाठी तसेच आपल्या आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी वचनांचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडगी महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. भैरप्पा कोणदे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी सेवा, एकता व सामाजिक बांधिलकी शिकली पाहिजे. येथे मिळवलेले ज्ञान व अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात देशाच्या पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन व प्रार्थना करून करण्यात आली. शिबिराचे आयोजक प्रा. प्रकाश सुरवसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, चेरमन बसवलिंगप्पा खेडगी यांच्या सहकार्याने व प्राचार्य डॉ. गुरलिंगप्पा धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेवा-संस्कार शिबिर २९ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले. शिबिरात विविध विषयांवरील व्याख्याने, चर्चा, गटचर्चा, श्रमदान, वृक्षारोपण, पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण १५० विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.
यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वैदेही वैद्य, प्रकल्प प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी, डॉ. सी. डी. अनेकर, प्रा. डी. सी. कोरे, प्रा. सिद्धराम पाटील, प्रा. एम. आर. गौरा, प्रा. गुरव, प्रा. महामने, प्रा. एस. जे. पाटील यांच्यासह अनेक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले, तर प्रा. सिद्धराम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button