गावगाथा

*भविष्यकाळाची स्वप्ने पाहण्याचे काम पुस्तक शिकवते* वाचन साखळी समूहात एकनाथ आव्हाड यांचे प्रतिपादन

वाचन साखळी समूहातील सदस्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड

*भविष्यकाळाची स्वप्ने पाहण्याचे काम पुस्तक शिकवते*
वाचन साखळी समूहात एकनाथ आव्हाड यांचे प्रतिपादन
ता.02 ( पुणे प्रतिनिधी )
“भूतकाळात डोकावण्यासाठी आणि भविष्यकाळाची स्वप्न पाहण्यासाठी पुस्तके आपल्याला शिकवतात. माणसा माणसांना जोडण्याचे काम पुस्तके करतात.” असे उद्गार सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड यांनी काढले. वाचन साखळी समूहाच्या राज्यस्तरीय आयोजित वाचनश्री पुरस्कार, वाचन यात्री पुरस्कार आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
वाचन साखळी समूह,महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रा. कुंडलिक कदम यांना वाचनश्री, ज्येष्ठ साहित्यिक अरुण देशपांडे यांना वाचनयात्री, तसेच या वर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन बेंडभर, अंजली गोडसे आणि ज्योती कोहळे या समूहातील सदस्यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष, साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक मा. एकनाथ आव्हाड, व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रकमेची पुस्तके देऊन करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक नागेश शेवाळकर, वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभा लोखंडे, रवींद्र लटिंगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद वाशिमचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा. गुरुनाथ पाटील, हे देखील आवर्जून उपस्थित होते.
वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभा लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. लटिंगे यांनी स्वागत, योगिता मराठे यांनी सूत्रसंचालन केले. तर मनोज अग्रवाल यांनी आभार मानले.

*चौकट*
वाचन साखळी समूह वाचन चळवळीला दिशा देणारा आहे. या समूहातील सदस्यांकडून झालेल्या पुस्तक परीक्षणाचे बारकावे टिपताना या सदस्यांनी लेखकाच्या साहित्यकृतीला योग्य न्याय देण्याचे काम केले आहे. अशा साहित्यिकांचा गौरव होणे ही अभिमानास्पद बाब आहे. समीक्षक हा वाचक आणि लेखक यांना जोडणारा दुवा आहे. पुस्तक का वाचावे हे जाणण्यासाठी समीक्षण वाचले पाहिजे. वाचन साखळी समूहातील सदस्यांनी ते समीक्षण अगदी प्रामाणिकपणे मांडून वाचकांची उत्सुकता वाढवली आहे.
– एकनाथ आव्हाड
-साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक

————-
फोटो, इंटरनेट, प्रकाशन
ओळ : वाचन साखळी समूहातील सदस्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button